लोकसभा निवडणुका लागण्याआधीपासून महाराष्ट्रभर चर्चा होती ती म्हणजे यंदा भाजप व इतर पक्ष कुणाचे तिकीट कापणार याची. याचे कारण असे की लोकसभेआधी पाच राज्यात विधानसभा झाल्या होत्या. यामध्ये भाजपने धक्कातंत्र वापरत अनेक दिग्गजांचा पत्ता कट केला होता. या धक्कातंत्रात अगदी माजी मुख्यत्र्यांना देखील दणका मिळालेला होता.
त्यामुळे भाजप व इतर पक्ष देखील अनेक दिग्गज असणाऱ्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार अशा चर्चा होत्या. दरम्यान आता महायुतीचे महाराष्ट्रामधील जागावाटप झाले असल्याने उमेदवारांचे चित्र क्लिअर झाले आहे. यामध्ये जवळपास ९ खासदारांची तिकिटे कापली आहेत. या खासदारांची तिकिटे का कापली याबाबत आपण जाणून घेऊयात..
‘या’ खासदारांची तिकिटे कापली
तिकीट कापलेल्या यादीत पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, उन्मेष पाटील, प्रीतम मुंडे, जयसिद्धेश्वर स्वामी, कृपाल तुमाने, भावना गवळी, हेमंत पाटील यांची नावे आहेत.
पूनम महाजन : या भाजपसाठी बहुमूल्य योगदान असणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या कन्या असून त्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार झाल्या आहेत. यावेळी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचा हवाला देत पक्षाने त्यांचे तिकीट कापले असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे पक्षातीलच काहींनी महाजन यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता अशी चर्चा आहे.
गोपाळ शेट्टी व मनोज कोटक : या दोघांना यंदा फटका बसेल व त्यांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा खूप आधीपासून लोक करत होते. त्याचप्रमाणे त्यांचे तिकीट कापले गेले. आता गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघातून पीयूष गोयल व मनोज कोटक यांच्या मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलेय.
उन्मेष पाटील : यांच्याऐवजी जळगावमध्ये स्मिता वाघ यांना तिकीट दिलं असून पक्षातंर्गत कलहाचा फटका उन्मेष पाटील यांना बसला असल्याचे बोलले जात आहे.
जयसिद्धेश्वर स्वामी : मतदारसंघात फारसा संपर्क नसणे, त्यांच्याविरोधात मतदारसंघात वातावरण असणे आदी गोष्टींमुळे सोलापूरमध्ये भाजपने त्यांना तिकीट दिले नसल्याचे समोर आले आहे.
प्रीतम मुंडे : यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले व भाजपने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापले. माधवं (माळी, धनगर, वंजारी) समाज सोबत असावा यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असे बोलले जात आहे. प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा पंकजा मुंडे यांच्या मागे ओबीसींचा मोठा सपोर्ट असल्याचे मानले जाते.
भावना गवळी : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामधून त्यांचे तिकीट कापले. मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी आहे आणि त्यांचा फटका निवडणुकीत बसू शकतो असा सर्वे समोर ठेवत त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचे सांगितले जाते.
हेमंत पाटील : यांना आधी उमेदवारी देण्याची घोषणा झाली व त्यानंतर त्यांची उमेदवारी मागे घेतली गेली. बाबूराव कदम कोहळीकर यांना त्याठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे.
कृपाल तुमाने : यांचेही तिकीट कापून काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना येथे तिकीट देऊन उभे करण्यात आले.
माघार घेतलेले दोन खासदार
भाजपचे अकोलाचे खासदार संजय धोत्रे यांनी प्रकृती बरी नसल्याने माघार घेतली तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उभा राहिल्याने माघार घेतली.