Identity Proof For Voting:- देशामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असून संपूर्ण देशामध्ये सात टप्प्यात व महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावणे खूप गरजेचे आहे.
ही लोकसभा निवडणुक शांततेत व पारदर्शकपणे पार पाडावी याकरिता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे नियम तयार करण्यात आलेले असून ते प्रत्येकाला बंधनकारक असणार आहेत. या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करता यावे याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आलेले आहे
व ह्या छायाचित्रासह असलेल्या ओळखपत्राचा वापर मतदार मतदान केंद्रावर ओळख पटवण्यासाठी करतील. परंतु बऱ्याचदा एखाद्याचे मतदार कार्ड हरवलेले असते किंवा इतर कारणामुळे मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करू शकत नाहीत.
अशा मतदारांकरिता मतदार ओळख पटवता यावी याकरिता 12 प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील व याबाबत निवडणूक आयोगाने 19 मार्च 2024 च्या आदेशान्वये घोषित केले आहे.
ही बारा कागदपत्रे मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून पडतील उपयोगी
यामध्ये मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, आधार कार्ड, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड,
रजिस्टर जनरल ऑफ इंडियाद्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी दिलेले ओळखपत्र, खासदार किंवा आमदारांना देण्यात आलेली ओळखपत्र
आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र ओळखीचा पुरावा म्हणून मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
मतदान कार्डवर असतील या त्रुटी तरी नाही राहणार काही काळजी
जर एखाद्या मतदाराची ओळख मतदार ओळखपत्राद्वारे पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील कारकुनी त्रुटी किंवा शब्द लेखनातील काही चुका, काही किरकोळ स्वरूपाच्या विसंगती असतील तर त्या दुर्लक्षित करण्यात याव्या असे आयोगाने म्हटले आहे.
तसेच मतदाराचे नाव मतदार ज्या ठिकाणी मतदान करत आहे त्या मतदार यादीत आहे परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी वितरित केलेल्या छायाचित्रासह ओळखपत्र असल्यास ते स्वीकारावे लागणार आहे.