Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापायला लागले. त्यात खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत उभी राहिल्याने अहमदनगर लोकसभेचा राजकीय नूर बदलून गेला.
सध्या संपूर्ण मतदार संघात राजकीय हॅंगओहर पाहायला मिळत आहे. ठिकाण कोणतेही असो, माध्यम कोणतेही असो सध्या एकच चर्चा पाहायला मिळते ती म्हणजे विखे येणार की लंके? सध्या याच चर्चांनी सर्व माहोल बदलून गेलेला दिसतोय.
गावपातळीवर, कुटुंबाकुटुंबात मतविभाजन
अहमदनगर लोकसभेचे सध्याचे वातावरण कुणा एका उमेदवाराच्या बाजूने झुकलेले दिसत नाही. सध्या दोन्ही उमेदवारांना मानणारा वर्ग दिसतोय. पूर्वी अशी एक पद्धत होती की किम गावपातळीवर एक गाथा मतदान व्हायचं. किंवा मग निदान कुटुंबप्रमुख सांगेल त्याला मतदान व्हायचं.
परंतु सध्या कुटुंबात देखील मतविभाजन झालेलं दिसत आहे.कुटुंबातील एखादी व्यक्ती एखाद्या उमेदवाराचा उदोउदो करते तर दुसरी व्यक्ती लगेच दुसऱ्याच उमेदवाराचा विजय नक्की अशी खात्री देते. त्यामुळे सध्या गावपातळीवर जा किंवा कुटुंबापर्यंत जा दोन्ही उमेदवारांची चलती असल्याचे दिसून येते.
व्हाट्सग्रुप, सोशल मीडियातही एकच चर्चा
सध्या सोशल मीडियाची साधने, व्हाट्सएप आदी जर ओपन केले तर प्रत्येक ठिकाणी विखे की लंके इतक्याच चर्चा दिसतात. यातील काही स्वयंघोषित कार्यकर्ते लगेच आपल्या उमेदवाराचे समर्थक बनतात.
आपल्या उमेदवाराने कसे चांगले काम केले हे तो लगेच सांगून मोकळा होतो. तर दुसऱ्या उमेदवाराचा समर्थक लगेचच त्याच्या अपोझिट असणारे फोटो व्हिडीओ टाकून देतो.
सरपंच,मान्यवर मंडळींनाही चॅलेंज
सध्या अनेक गावातील स्थिती आहे की जर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच आदी जर एखाद्या उमेदवाराचे काम करत असतील तर त्यांच्याच कुटुंबातील काही सदस्य त्यांनाच चॅलेंज देत दुसऱ्या उमेदवाराची वाहवा करताना दिसत आहे.
म्हणजेच या निवडणुकीचा इतका हॅंगओहर चढला आहे की काहींना ही डोकेदुखी देखील वाटायला लागली आहे.
निवडणूक निर्भेळ असावी
राजकीय फिव्हर चढणे व राजकीय मतभेद असणे साहजिक आहे. परंतु उमेदवारांच्या शर्यतीत नागरिकांनी मात्र टोकाची भूमिका घेऊन वाद घालू नये असे शहाणे सुरते मंडळी सांगतात. एकंदरीतच कोणताही उमेदवार निवडून येऊ, निवडणूक निर्भेळ व्हावी व मतभेद निवडणुकांपुरतेच मर्यादित ठेवावेत इतकीच इच्छा..