Ahmednagar Politics : महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच गरमागरम झाले आहे. अहमदनगरच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. विखे पाटील पितापुत्र हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात.
दरम्यान आता शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून खा. सुजय विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच विखे व मुंडे अशा आमच्या दोन्ही परिवाराला पवारांनी कायमच वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून त्रास देण्याचे काम केल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
नेमके काय म्हणाले होते ज्येष्ठ नेते शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात जास्तीत जास्त सभा झाल्या पाहिजेत यासाठी राज्यात पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. यावरूनच आता खा. सुजय विखे यांनी शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात होणाऱ्या सभांवरून टीकास्त्र सोडले आहे.
काय म्हणाले खा. सुजय विखे
सुजय विखे यांनी म्हटलंय की, शरद पवार हे महाराष्ट्राचे तसेच देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रभर फिरत प्रचार केला पाहिजे. परंतु ते तर नगरमध्येच पाच ते सहा सभा घेणार असून अजूनही काही कॉर्नर सभा ते घेणार असल्याची माहिती मला मिळाली आहे.
त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पंतप्रधानांवर बोलणे हे हास्यास्पद असल्याचे विखे म्हणाले आहेत.
यंत्रणा वापर करून त्रास
त्याचप्रमाणे विखे पाटील यांनी आणखीही गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले गोपीनाथ मुंडे व बाळासाहेब विखे हे सर्वसामान्यासाठी एकत्र आलेले नेते. परंतु दोन्ही परिवाराला शरद पवारांनी कायम त्रास दिला.
प्रचार सभेत पवारांसोबत होत असलेल्या संघर्षाबाबत बोलताना ते म्हणले की, पवारांनी कायमच आमच्या दोन्ही परिवाराला वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून त्रास दिला असून आमच्या दोन्ही परिवारांनी संघर्ष केला असून आम्हाला जनतेने मोठी साथ दिलीये.
दरम्यान त्यांनी निलेश लंके यांनी आपल्या भाषणादरम्यान पोलीस प्रशासनाला दिलेल्या धमकीबाबत बोलताना मी पांडुरंगाचे आभार मानतो की त्यामुळे तरी निदान समोरच्या उमेदवाराचा खरा चेहरा जनतेच्या समोर आलाय. अशी प्रवृत्ती अहिल्यानगरची जनता स्वीकारणार नसल्याची खात्री असल्याचे ते म्हणाले.