Ahmednagar Loksabha : सहकाराची पंढरी, पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून ख्याततनाम असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. हा जिल्हा राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा आहे.
नगर जिल्ह्यात असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कळसूबाई शिखर, हरिषचंद्र गड, चांदबिबीचा महाल, पट्टा किल्ला ही ऐतिहासिक स्थळे याच्या वैभवात भर घालतात. दुसरीकडे शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा देवी ही धार्मिक तीर्थस्थाने नगर जिल्ह्यातील आध्यात्माचे दर्शन घडवतात.
अशा या नगरमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाची निवडणूक सुद्धा चुरशीची होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीने भाजपाचा उमेदवार मैदानात उतरवला आहे.
भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा 2019 मध्ये ज्यांनी येथून विजयाची पताका फडकवली त्यांना म्हणजेच विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला अर्थातच पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिलेली आहे.
या दोन्ही उभय नेत्यांना उमेदवारी जाहीर होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. त्यामुळे आता विखे पाटील आणि निलेश लंके यांनी निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे. खरे तर अहमदनगर लोकसभा हे नेहमीच राज्यातील राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे.
पण तुम्हाला अहमदनगरचे पहिले खासदार कोण होते याबाबत माहिती आहे का ? नाही, मग आज आपण अहमदनगरचे पहिले खासदार कोण होते ? नगर मधून पहिल्यांदा संसदेत कोण पोहोचले ? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अहमदनगरचे पहिले खासदार कोण
अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पाथर्डी-शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. याच लोकसभा मतदारसंघात स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत अर्थातच 1952 च्या पहिल्या निवडणुकीत कामगार किसान पक्ष आणि काँग्रेसमध्ये लढत झाली.
या निवडणुकीत काँग्रेसकडून उत्तमचंद रामचंद भागवत हे उभे राहिले होते तर कामगार किसान पक्षाकडून नवशेरवानजी नौरोजाजी साठा यांना उमेदवारी दिली गेली होती. या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे यु. आर. भागवत हे प्रचंड मताधिक्यांनी निवडून आलेत.
ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार ठरलेत. भागवत हे भाऊसाहेब फिरोदिया यांचे सहाय्यक होते. त्यांच्यावर भाऊसाहेब फिरोदिया यांचा मोठा प्रभाव होता. ते स्वातंत्र्यपूर्व काळात नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुद्धा राहिले होते. यु. आर. भागवत यांच्या काळात पिंपळगाव मालवी तलावाचे काम मार्गी लागले.
तसेच मुळा धरण निर्मितीमध्ये देखील त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. 1952 मध्ये ते खासदार बनलेत आणि राज्यात मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी नगर लोकसभा मतदारसंघातील कर्जत-जामखेड या भागाला दुष्काळाची झळ अधिक बसली होती.
दरम्यान त्यांनी या दुष्काळाची दाहकता संसदेत मांडली. एवढेच नाही तर त्यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना दुष्काळग्रस्त भागात आणले. दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत केली. दुष्काळात त्यांनी सरकारी गोदाम फोडले आणि गरजूंना अन्नधान्य वाटप केले.
पण या प्रकरणात त्यांना अटक झाली. दरम्यान दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अर्थातच 1957 मध्ये त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी दिली. पण, या काळात राज्यात झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा फटका महाराष्ट्र काँग्रेसला बसला.
यामुळे या निवडणुकीत भागवत यांना पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर लोकसभेत कामगार किसान पक्षाचे आर के खाडीलकर हे निवडून आलेत. पुढे 1962 मध्ये अर्थातच तिसऱ्या लोकसभेसाठी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार होती.
मात्र फिरोदिया कुटुंबाच्या उपकाराची जाण ठेवून त्यांनी मोतीलाल फिरोदिया यांच्यासाठी उमेदवारी नाकारली. काँग्रेसने मग मोतीलाल फिरोदिया यांना उमेदवारी दिली. भागवत यांनी मग फिरोदिया यांना निवडून आणले.