महाराष्ट्राच्या राजकारणाचा देशाच्या राजकारणात महत्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. आजवरच्या काळात देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका व त्यांचे कामकाज अत्यंत महत्वाचे राहिलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, गोपीनाथ मुंडे, शंकरराव चव्हाण, शरद पवार आदी नेत्यांचा समावेश होतो. दरम्यान आता जुन्या जाणत्या राजकीय खोडांपैकी अद्याप राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार व मंत्री नितीन गडकरी सक्रिय आहेत. शरद पवार जवळपास ५० वर्षांपासून संसदीय राजकारणात सक्रिय आहेत.
मागील दोन वर्षांत राष्ट्रवादीत झालेली फूट व शरद पवारांची ताकद कमी करण्याचा झालेला राजकीय प्रयत्न सर्वानीच पाहिला. पण असे असले तरी आजही त्यांचे सोबती, अनेक विरोधकही ‘काही करा पण शरद पवार यांचा नाद नाही करायचा’ असे म्हणतात अशी चर्चा नेहमीच लोक करतात. आजही त्यांचा पक्ष फोडूनही , राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न करूनही लोकसभेला भाजपने त्यांची धास्ती घेतल्याचे सर्वानाच दिसते आहे. पण असे का? त्यांच्याकडे वेगळे असे काय आहे? काही गोष्टींच्या आधारे जाणून घेऊयात –
थेट जनतेशी संपर्क
सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शरद पवार यांचे थेट लोकांशी संपर्क आहे. त्यांनी आजवर थेट जनतेत जाणे हेच आपले राजकीय अस्त्र ठेवले आहे. त्यामुळे कोणतेही संकट असो किंवा आनंदाचा क्षण ते थेट जनतेत जाऊनच भेटणार हे ठरलेले असते. त्यामुळे शरद पवार यांच्याशी थेट भावनिक नाळ जुळलेली असल्याने लोक त्यांचा अपमान झाल्यास किंवा इतर काही झाल्यास थेट भावनिक होतात व त्याचे राजकीय परिणामही दिसतात.
पॉवरफुल माणसे जोडली
शरद पवार यांनी पक्ष संघटन करत असताना स्थानिक पॉवरफुल माणसे जोडली. उदा. संस्थानिक, कारखानदार आदी. त्यांना पदेही दिली. मंत्री नितीन गडकरी एका भाषणात म्हटले होते, की काही पक्ष हवेवर, लाटेवर चालतात पण पवारांचा पक्ष माणसांवर चालतो त्यात बदल होत नाही. त्यामुळे या लोकांचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याचे चांगले कसब पवारांना अवगत आहे.
सहकार ताब्यात
शरद पवार यांना सहकाराची ताकद समजली होती. त्यांनी आजवर सहकार्यावर आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. ही ताकद आजही पवारांच्या सोबत आहे. आणि जो पक्का राजकारणी आहे त्याला या सहकाराची राजकारणातील ताकद व राजकारण हलवून सोडण्याची ताकद काय आहे हे चांगलेच समजते.
जनतेची अचूक नस ओळखण्याची ताकद
शरद पवार यांना अनुभव दांडगा आहे. ते जनतेची नस ओळखण्यात माहीर आहेत. त्यामुळे सध्या भाजपनेही त्यांची धास्ती घेतलीये त्याचे हे देखील एक कारण आहे. कोणता प्रश्न कधी मांडायचा व जनतेला संघटित करत लादाह कधी उभारायचे हे त्यांना चांगले माहित.
उदा. महाराष्ट्रातील वातावरण भाजपला पोषक व पक्ष फुटल्यानंतर त्यांची ताकदही थोडीफार घटली. पण पवार यांनी महाराष्ट्रातील काही प्रश्न अचूक हेरले. उदा. कांदा व दूध यांची भाववाढ. यावरून आंदोलने उभी केली. तसेच नाशिकमध्ये देखील त्यांनी गुजरातला जाणारे पाणी नाशिकची का नाही असा कळीचा मुद्दा पेरून विरोधकांची अवस्था धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी केली.
आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मराठा आरक्षण. या लढ्याशी त्यांचा काहीही संबंध नाही हे जरी खरे असले तरी याने निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा मात्र त्यांनी कशा पद्धतीने उठवला हे सांगणे न लगे.
कोणत्याही पक्षात असो, उपकार जाणून असणारी मंडळी
असे म्हटले जाते की शरद पवार यांचे सर्वच पक्षात चांगले मित्र आहेत. आजवर शरद पवार यांनी अनेक संस्थानिक, कारखानदार यांसह अनेक लोकांना बळ दिले व उभे केले. त्यामुळे कितीही पक्ष बदल केला किंवा विरोधात वातावरण गेले तरी शरद पवार यांच्या उपकारांची जाण हे लोक ठेवून आहेत. त्यामुळे पवारांनी अगदी ठरवलंच तर त्यांना ही लोक आतून मदत करतील अशीही चर्चा होते.
भाजपलाही धास्ती का?
वरील काही गोष्टी पाहता विरोधकही पवारांना का घाबरून असतात हे लक्षात येतेच. पण पक्ष फोडूनही भाजपला सध्या शरद पवार यांचीच धास्ती का वाटतीये? पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा झाल्या. बहुतांश भाषणात त्यांनी शरद पवार यांचा समाचार घेतल्याचे दिसते. असे का? तर त्यामागे वरील काही करणे तर आहेतच, शिवाय आणखी एक फॅक्टर म्हणजे, सध्या महाराष्ट्रात जरी त्यांचा पक्ष फोडला असला तरी भाजपने नेते फोडले, ब्रँड नाही नेऊ शकले. महाराष्ट्राचा विचार करता राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार असा ब्रँड तयार झालेला आहे. त्यामुळे पक्ष फुटून जरी भाजपसोबत असला तरी मतदार मात्र ब्रॅण्डमागे उभा राहील अशी एक भीती त्यांना असावी अशी चर्चा काही लोक करतात.