सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक भागात सध्या सभांचा धडाका सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापले स्टार प्रचारक सभा घेत असून राजकीय मैदान गाजवत आहेत.
दरम्यान सध्या भाजपकडून पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांची मागणी वाढलेली दिसते. मागील दोन पंचवार्षिकचा जर विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा जास्त व्ह्यायच्या तुलनेत योगी आदित्यनाथ यांच्या सभा त्या तुलनेत कमी होत होत्या.
परंतु यंदाच्या निवडणुकांमध्ये जर पाहिले तर योगी आदित्य नाथ यांच्या सभा मागीलवेळीपेक्षा जास्त असल्याचे किंवा त्याचा जास्त प्रमाणात प्रसार करण्याचे काम सुरु असल्याचे दिसते.
योगी आदित्यनाथ यांचा जलवा
आगामी पंतप्रधान म्हणून भाजप समर्थक व कार्यकर्ते हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव प्रकर्षाने सांगतात. तसेच महाराष्ट्रभर त्यांचे चाहते भरपूर आहेत. त्यांचे आक्रमक बोलणे व त्यांची कार्यपद्धती आदींचे जबरदस्त फॅनफॉलोविंग महाराष्ट्रात आहे.
त्यामुळे मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी व मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट वक्तव्य करणाऱ्या आदित्यनाथांना पसंती दिली जात आहे. तसेच त्यांच्या सभेचे ब्रॅंडिंगही जबरदस्त केले जात आहे.
पीएम मोदींचा प्रभाव कमी होतोय?
योगी आदित्यनाथ यांच्या सभा का? तर मग कुठेतरी आता मोदी यांचा प्रभाव कमी होत आहे का? त्यांच्या भाषणापेक्षा योगी यांच्या भाषणाचा प्रभाव जास्त पडत आहे का? अशी देखील चर्चा सध्या होत आहे. महाराष्ट्रात इतरही अनेक नेते आहेत पण आदित्यनाथ यांच्यासारखा प्रभाव असणारा नेता नसल्याचे म्हटले जात आहे.
सोलापूरमध्ये सभा संपन्न, नगरमध्येही येणार
आज (दि.१ मे) मुख्यंमत्री आदित्यनाथ यांची सोलापूरमध्ये सभा झाली. तसेच त्यांची सभा नगरमध्ये देखील होणार आहे असे म्हटले जात आहे. एकंदरीतच महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांचा करिष्मा चालू शकतो असे भाजप उमेदवारांना वाटत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रभाव कमी?
महाराष्ट्र मध्ये सध्या देवेंद्र फडवणीस, अजित पवार, धनंजय मुंडे आदींसारखे फायर ब्रँड नेते आहेत. परंतु पक्ष फोडाफोडी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पूर्वी झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आदी कारणांमुळे या नेत्यांचा म्हणावा असा परिणाम होईल की नाही अशा संभ्रमात काही उमेदवार असल्याचे देखील जाणकार सांगतात. त्यामुळे यावर योगी हे पावरफुल औषध ठरतील व जनतेत असलेल्या नाराजगीला योगींच्या माध्यमातून आपोआप वळवले जाईल, त्यामुळेही कदाचित योगी यांच्या सभा असाव्यात असे म्हटले जात आहे.