विधानसभा निवडणूक

मतदारराजा ‘फतवा’ ‘मनसे’ ऐकणार का ? भाजपने राज ठाकरेंसाठी आखलेली राजकीय गणिते यशस्वी होतील का? राजकीय विश्लेषक म्हणतात..

Published by
Ahmednagarlive24 Office

महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे एक वेगळेच वलय व एक वेगळाच दरारा महाराष्ट्रात राहिला आहे. बाळासाहेब ठाकरेंची छबी राज ठाकरेंच्यात आजही लोक पाहतात. आपल्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राला ते खिळवून ठेवू शकतात हे सर्वानाच माहित आहे.

आता नुकताच त्यांनी लोकसभेसाठी महायुतीला अर्थात भाजपला पाठिंबा दिलाय. भाजपचे नेते मंत्री अमित शहा व राज ठाकरे यांची दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी निवडणुकीत न उतरता महायुतीला पाठींबा दिला.

नुकत्याच महायुतीसाठी पुण्यात त्यांची सभा झाली व या सभेत त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मुस्लिम फतवे काढत असतील तर हिंदुंनीही भाजपला मतदान करण्यासाठी फतवा काढावा, असा स्वयंघोषित नाराच यावेळी त्यांनी मतदारांना दिला असल्याचे दिसले.

काही राजकीय विश्लेषण करणारे म्हणतात, मनसेच्या अठरा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा स्वतः राज ठाकरे यांनी राजकीय व सामाजिक भूमिका बदलली आहे त्यामुळे पक्षाची हवी तशी प्रगती झाली नाही. असे असतानाच आता हा नवीन फतवा मनसे कार्यकर्ते व मतदार मान्य कितीपट करतील व या फत्तव्याचा उपयोग महायुतीला किती होईल याबाबत साशंकता आहे.

‘मनसे’ची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या कारभाराला विरोध केला. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेशी (उध्दव ठाकरे) जवळीक साधण्याचा केलेला प्रयत्न चर्चेत राहिला होता. त्यानंतर २०१४ साली भाजपला पाठिंबा, पुन्हा २०१९ साली केंद्रातील भाजपवर जोरदार टीका, यावेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे खूप गाजले होते.

सर्व माध्यमे नरेंद्र मोदीयांनी विकत घेतली आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमे पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याची टीका ठाकरे यांनी केली होती. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध करताना त्यांनी एकही वीट रचू न देण्याचा इशारा दिला होता. एक-दोन शहरांसाठी एक लाख कोटी रुपये कसे खर्च होतात, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्याचबरोबर मुंबईतील शिवस्मारक, मोदी सरकारच्या अनेक योजना आणि धोरणांवर ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणूक प्रचारात टीका केली होती.

आता यंदा २०२४ ला ठाकरे यांनी पुन्हा गिरकी घेत लोकसभेला भाजपलाच बिनशर्त पाठिंबा देत पुन्हा राजकीय गणित बदलवलेले दिसले. महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभाही राज ठाकरे घेत आहेत. हे असले तरी अशा सभा घेऊन पक्षाच्या पदरात नेमके काय, अशी भावना कार्यकर्त्यांत असल्याची चर्चा आहे.

तसेच राज ठाकरे यांनी जरी ही भूमिका घेतली असेल तर निदान लोकसभेच्या निवडणुकीत तरी मनसे सैनिक त्यांचे कितपत ऐकतात याबाबतही साशंकता असल्याने बोलले जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा महायुतीला किती उपयोग होईल हे अद्यापतरी साशंकच आहे असे राजकीय विश्लेषक म्हणतात.

कट्टर विरोध ते पुन्हा एकत्रित संधान
मोदी-शहा यांना महाराष्ट्रात येऊ देऊ नका, तसेच अजित पवार यांच्यावर कायमच जोरदार टीका करणारे राज ठाकरे आता पुन्हा त्यांच्याच सोबत गेले. मराठीचे हित ते हिंदुत्व तसेच नरेंद्र मोदींची स्तुती इथपासून सुरु झालेला प्रवास ते त्यांना कट्टर विरोध ते पुन्हा त्यांच्याशी जवळीक असा इथपर्यंतच्या ठाकरे यांच्या प्रवासाला मतदार किती साथ देतो हे देखील आता येत्या निकालावरून कळणार आहे.

Ahmednagarlive24 Office