अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-“दसरा दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची मागणी वाढल्याने

सध्या सर्वत्र कोळशाचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होऊन महाराष्ट्रासह देशात लोडशेडिंगचे संकट घोंगावत आहे.

मात्र अशा परिस्थितीत राज्यावर वीज निर्मितीचं संकट असलं तरी लोडशेडिंगची वेळ येऊ देणार नाही”, असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलाय. ते अहमदनगर येथे बोलत होते. तसेच ते म्हणाले कि, राज्यातील नागरिकांनी विजेचा वापर जपुन करावा.

पुढे बोलताना तनपुरे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या मालकीच्या कोळसा खाणीमध्ये ऑगस्ट महिन्यात कामगारांच्या झालेल्या संपामुळे तसेच इतर कारणामुळे कोळशाचा तुटवडा जाणवत आहे , सोबतच ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतीपंपासाठी विजेची मागणी वाढली होती.

ऑगस्ट महिन्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे कोळसा खाणीमध्ये त्याचा परिणाम झाला. त्यामुळे कोळशाचा अधिक तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम वीज निर्मितीवर झाला असून येत्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना वीज तुटवड्याला सामोरे जावे लागू नये यासाठी राज्य सरकार तसेच महावितरण प्रयत्नशील आहे.

लोडशेडिंगच्या संकटापासून वाचवण्याचे आमचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. वीज निर्मिती कंपन्यांकडून चढ्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवली जात आहे.

आगामी काही दिवसातच सर्व सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान नागरिकांनी संभाव्य विज तुटवडा लक्षात घेऊन विजेचा वापर जपून करावा असे आवाहन राज्यमंत्री तनपुरे यांनी केले आहे.