अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या मंगळ मोहिमेतील क्रू (चालक दल) सदस्य वर्षभराच्या प्रवासानंतर त्यांच्या अंतराळ यानातून बाहेर पडले. मात्र या यानाने पृथ्वी सोडली नाही.
कारण नासाने ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये मंगळाच्या वातावरणाचे अनुकरण करणारे निवासस्थान तयार केले आहे, याठिकाणी १२ महिन्यांहून अधिक काळ बाह्यजगापासून अलिप्त राहिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता चार क्रू सदस्य या अंतराळ यानातून बाहेर आले.
भविष्यात मंगळावर मोहिमा पाठवताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. क्रू मेंबर्सनी याठिकाणी स्पेस वॉक म्हणजेच ‘मार्सवॉक’चेही प्रात्यक्षिक केले. तसेच भाजीपालाही पिकवला.
या मोहिमेंतर्गत हॅस्टन, आन्का सेलारिऊ, रॉस ब्रॉकवेल आणि नॅथन जोन्स या चार अंतराळवीरांनी २५ जून २०२३ रोजी थ्री डी प्रिंटेड निवासस्थानात प्रवेश केला होता. या मिशनचे फिजिशियन आणि वैद्यकीय अधिकारी जोन्स म्हणाले की, त्यांचे ३७८ दिवस बंदिवासात गेले.
चार वैज्ञानिक मंगळ ग्रहासारख्या वातावरणात १,७०० चौरस फूट जागेत राहत होते. यावेळी त्यांना भविष्यातील मंगळावरील संभाव्य आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यात मर्यादित संसाधने, अलगाव आणि पृथ्वीशी २२ मिनिटांपर्यंतच्या संवादातील विलंब अशा आव्हानांचा समावेश आहे.
नासाने सांगितले की, अशा दोन अतिरिक्त मोहिमा नियोजित आहेत. नासाच्या म्हणण्यानुसार, क्रू मेंबर्स स्पेसवॉक करीत राहतील आणि शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित आरोग्य आणि कार्यक्षमतेच्या घटकांबद्दल माहिती गोळा करतील.
जॉन्सन स्पेस सेंटरचे उपसंचालक स्टीव्ह कॉर्नर म्हणाले की, जागतिक अवकाश संशोधन प्रयत्नात अग्रेसर बनण्याच्या अमेरिकेच्या ध्येयाच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल आहे.