Trekking Points :- महाराष्ट्र म्हणजे उंच उंच शिखर तसेच डोंगर दऱ्या, सुंदर अशी धबधबे तसेच निसर्गरम्य पर्यटन स्थळे यांची जणू खाणच आहे. महाराष्ट्राच्या कुशीमध्ये असे अनेक निसर्गाची रत्ने दडलेली आहेत जी देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे लाखोंच्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक महाराष्ट्राला भेट देतात.
पर्यटनामध्ये काही व्यक्तींना निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडते तर काहींना थ्रिलर अनुभवायचा असतो व अशा पर्यटकांना ट्रेकिंगचा आनंद घ्यायला खूप आवडते. तुम्हाला देखील या पावसाळ्यामध्ये अशाच प्रकारचा ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल व पडणाऱ्या पावसाची मजा लुटायची असेल तर महाराष्ट्र मध्ये अशा अनेक ट्रेकिंग पॉईंट आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमची इच्छा पूर्ण करू शकतात.
ही आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट्स
1) कळसुबाई ट्रेक – जर आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या ट्रेकिंग पॉईंटच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कळसुबाई शिखराचे नाव घ्यावे लागेल. हा पॉईंट महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची 5400 फूट असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये आहे. तुम्हाला जर कळसुबाई शिखराला भेट द्यायची असेल तर तुम्ही मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणाहून सहजपणे या ठिकाणी जाऊ शकतात. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जंगले तसेच धबधबे इत्यादीचा आनंद घेता येऊ शकतो व या ठिकाणचा ट्रेक पाहिला तर तो नागमोडी वाटांमुळे थोडासा अवघड आहे. परंतु तुम्ही उंच शिखरावर जेव्हा पोहोचाल तेव्हा दिसणाऱ्या दृश्याचे तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही.
2) विसापूर किल्ला – मुंबई तसेच पुणे व लोणावळ्याजवळ विसापूर हे एक ट्रेकिंग साठी उत्तम ठिकाण असून विसापूर किल्ला हा लोणावळा या ठिकाणी आहे. विसापूर किल्ल्याला संबळगड या नावाने देखील ओळखले जाते. तुम्ही जर विसापूर किल्ल्याला भेट दिली तर या ठिकाणी असलेल्या सुंदर कमानी तसेच मंदिरे व पाण्याची टाकी तसेच गुहा मनाला वेधून घेतात. तसेच या किल्ल्यावर तुम्हाला दगडी वाडा देखील पाहायला मिळतो.
3) माळशेज घाट – माळशेज घाट निसर्गाने समृद्ध असलेले एक ठिकाण असून सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीमध्ये वसलेले आहे. माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर दरम्यानचा जो काही रस्ता आहे त्यामध्ये लागतो. या ठिकाणी असलेल्या छोट्या-मोठ्या टेकड्या तसेच पावसाळ्यात प्रवाहित झालेले धबधबे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहेत. पावसाळ्यामध्ये धुक्याची चादर आणि ऊन पावसाच्या खेळामध्ये माळशेज घाटाचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. विशेष म्हणजे या ठिकाणी आढळून येणारे फ्लेमिंगो पक्षी हे खास आकर्षण आहे. जर तुम्ही जुलै तसे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये या ठिकाणी गेलात तर तुमच्यासाठी फ्लेमिंगो पक्षी पाहणे हा एक मनमोहक अनुभव ठरेल.
4) रतनगड किल्ला – सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये रतनगड किल्ला आहे व हा नगर जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ भंडारदरापासून अवघा 30 किलोमीटरवर आहे. तुम्हाला जर पुण्यावरनं यायचे असेल तर 183 किमी आणि मुंबईवरून यायचे असेल तर 197 किमीच्या अंतर पार करून रतनगड किल्ल्याला येता येते. रतनगड किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला आजूबाजूच्या उंच उंच पर्वतरांगा आणि धरण यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. असेच रतनगड किल्ल्यावर एक गुहा देखील असून ते एक प्रमुख आकर्षण आहे.
5) कोरीगड ट्रेक – कोरीगड हे लोणावळ्याच्या पूर्वेला असून या ठिकाणाला कुमवारी गड या नावाने देखील ओळखतात. कोरीगड हा समुद्रसपाटीपासून 929 मीटर उंच असून या किल्ल्याच्या पूर्वेला ॲम्बि व्हॅली प्रकल्पाचा एक कृत्रिम तलाव आहे. तसेच या गडावर वरती गेल्यावर दोन तलाव आहेत व या ठिकाणी वर्षभर कधीही तुम्ही भेट देऊ शकतात. तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगची मजा घ्यायची असेल तर कोरीगड हा एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी कोराई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे व याशिवाय दोन मंदिरे देखील प्रसिद्ध आहेत.
6) हरिश्चंद्रगड – हरिचंद्र गड हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त आव्हानांनी भरलेला ट्रेक म्हणून ओळखला जातो. हा एक खूप साहसी ट्रेक असून अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात 4670 फूट उंचीवर आहे. हरिश्चंद्रगडावर अनेक गुहा आणि वेगवेगळे बांधकामे आपल्याला संस्कृतीचे दर्शन घडवतात. याशिवाय या ठिकाणी केदारेश्वर गुहा तसेच पुष्कर्णी, हरिचंद्र मंदिर आणि लेणी पर्यटकांचे खास आकर्षणाचे केंद्र आहेत.