सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असून या पडणाऱ्या पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसायला लागले असून निसर्गाने सगळीकडे हिरवी चादर पांघरल्याचे सध्या चित्र आहे व बऱ्याच ठिकाणी खळाळून वाहणारे नदी नाले आणि दाट धुक्यांमध्ये हरवलेली अवघी सृष्टी मनाला मोहून टाकणारी आहे.
त्यामुळे या कालावधीमध्ये अनेक व्यक्ती कुटुंब किंवा मित्रांसोबत वेगवेगळ्या निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देताना आपल्याला दिसून येत आहे. या कालावधीमध्ये बहुसंख्य पर्यटक धबधब्यांना भेटी देतात. कारण या कालावधीमध्ये अनेक ठिकाणचे धबधबे प्रवाहित होतात, व त्या ठिकाणी असलेली हिरवाई तसेच त्यातून कोसळणारे धबधबे हे निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला मोहून टाकणारे असते.
त्यामुळे या पावसामध्ये तुमचा देखील कुठे धबधबे पाहायला जायचा प्लान असेल तर आपण या लेखामध्ये पुण्याजवळील काही महत्वाच्या धबधब्यांची माहिती घेणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही गेलात तर दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव आणि टेन्शन तुम्ही साफ विसरून जाल व निसर्गाच्या सानिध्यात रमुन जाल.
हे आहेत पुण्याजवळील प्रसिद्ध धबधबे
ताम्हीणी घाट धबधबा :
पुण्याजवळ हा धबधबा असून जेव्हा तुम्ही या धबधब्याकडे जातात तेव्हा त्या ठिकाणी जाणारी वाट ही संपूर्ण निसर्गाने सजलेली अप्रतिम आणि सुंदर अशी आहे. या ठिकाणी डोंगराची पसरलेली अपूर्व हिरवाई आणि संपूर्ण क्षेत्र जंगलांनी व्यापलेले असल्याने या ठिकाणी खूपच निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते. ताम्हीणी घाट धबधबा मुळशी तलावावर असल्याने या ठिकाणचा परिसर निसर्गाने समृद्ध असा आहे. पुण्यापासून या धबधब्याचे अंतर 93 किलोमीटर आहे.
चायनामन्स धबधबा :
हा महाबळेश्वर जवळ असलेला सुंदर धबधबा असून पुण्याजवळ असलेल्या धबधब्यांपैकी एक सुंदर धबधबा आहे. तुम्हाला धबधबा पहायचा असेल तर हा धबधबा पाहणे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही कारने गेलात तर पुण्यापासून साधारणपणे दोन तासात तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकतात. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे अशा व्यक्तींसाठी चायनामन्स धबधबा एक उत्तम डेस्टिनेशन आहे व पुण्यापासून 121 किलोमीटर अंतरावर आहे.
लिंगमळा धबधबा :
हा देखील पुण्याजवळ असलेला एक सुंदर व निसर्गाने समृद्ध असलेला धबधबा असून हा धबधबा पाचशे फुट उंचीवरून खाली कोसळतो व त्याचे हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवणे हा वेगळाच अनुभव आहे. या धबधब्याचे पाणी जेव्हा खाली जमिनीवर आदळते व त्याचा जो आवाज येतो तो आपल्याला एकांत आणि शांततेची एक विलक्षण अनुभूती देतो. पुण्यापासून लिंगमळा धबधब्याच्या अंतर 131 किलोमीटर आहे.
ठोसेघर धबधबा :
पुण्याजवळील जे धबधबे आहेत त्यापैकी ठोसेघर धबधबा हा एक निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला धबधबा असून भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. ठोसेघर धबधब्याच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर अनेक हिरव्यागार जंगलांनी व्यापलेला आहे व या ठिकाणी असलेल्या सुंदर टेकड्या मनाला निरव शांतता देतात व निसर्गाचे सौंदर्य काय असते याचा उत्तम अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळतो. पुणे ते ठोसेघर धबधबा हे अंतर 133 किलोमीटर आहे.
भाजे धबधबा :
घनदाट जंगलांमधून हा धबधबा जेव्हा खाली कोसळतो व त्यावर जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा हे विलक्षण दृश्य पाहण्यासारखे आहे. भाजे धबधबा लोणावळ्यातील 22 दगडी लेण्याजवळ असून हे या धबधब्याचे एक वैशिष्ट्य आहे. कामशेत पासून 13 किलोमीटर अंतरावर हा धबधबा असून याला प्राचीन शिल्पांनी देखील वेढले आहे. भाजे धबधबा पुण्यापासून 61 किलोमीटर आणि मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे.