सह्याद्रीच्या उंच व रांगड्या डोंगर रांगांवरून कोसळणाऱ्या ताम्हिणी घाट व देवकुंड धबधब्यातून सध्या पांढरे शुभ्र फेसाळणारे पाणी सध्या देशभरातील पर्यटकांना साद घालू लागले आहे. येथील निसर्ग सौंदर्य हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.
कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. येथून देवकुंडपर्यंत जाणारा ट्रेकदेखील अप्रतिम आहे.
उंचावरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचे वातावरण हे सारे क्षण अनुभवण्यासारखे असतात.
त्यामुळे येथे असंख्य पर्यटक गर्दी करू लागले आहेत. येथील अद्वितीय देवकुंड, अंधारबन ट्रेक, समृद्ध निसर्ग व फेसाळणाऱ्या धबधब्यांनी वेढलेला ताम्हिणी घाट व व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग पावसाळी पर्यटनासाठी जणू पर्वणीच आहे. येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहता आपण स्वर्गात आल्याचे जाणवते.
पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटक, निसर्गप्रेमी व अभ्यासक येतात. त्यामुळे येथील हॉटेल व लॉज व्यावसायिक, दुकानदार यांचा व्यवसाय तेजीत असतो. त्यातून येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना रोजगार मिळतो. ग्रामपंचायतीला देखील पर्यटन कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून गावाचा विकास करून पर्यटकांना योग्य सोयीसुविधा पुरवता येत आहेत.
विळ्यापासून पुण्याकडे जाताना ताम्हिणी घाट सुरू होतो. घाटाच्या एका बाजूला डोंगर दुसऱ्या बाजूला दरी, पावसाचे खाली आलेले ढग व हिरव्यागार निसर्गाने बहरलेले दृश्य पाहून येथे स्वर्गात आल्यासारखे वाटते. रवाळजे येथील व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग उल्लेखनिय आहे. येथे हजारो पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसतात.
सध्या फेसाळणारे धबधबे येथे येणाऱ्या पर्यटकांची माने प्रसन्न करून टाकतात. पर्यटकांसाठी प्रशासनाने येथे स्वच्छतागृहे व तंबू अशा काही सोयीसुविधा केल्यास येथे आणखी पर्यटकांची संख्या वाढेल. असे मत येथे आलेल्या अमित जाधव या पर्यटकाने व्यक्त केले.
पाटणूसच्या कुंडलिका विद्यालयातील स्थानिक निसर्ग पशुपक्षी अभ्यासक राम मुंढे हे मागील १५ वर्षांपासून हा संपूर्ण परिसर पादाक्रांत करत आहे. त्यांनी सोशल मीडियावर या परिसरातील पक्षी, निसर्ग, फुलांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करून नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘इनक्रेडिबल कोकण’ ताम्हाणी, विळे, पाटणूस, भिरा’ हे फेसबुक पेज तयार केले आहे.
माणगाव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे व रवाळजे ही गावे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसले आहे. या गावाच्या अवतीभोवती सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. या सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावरून फेसळणारे पांढरे शुभ्र धबधबे सरळ खाली येऊन याच ठिकाणावरून पुढे नदी रुपात अरबी समुद्रकडे आगेकूच करतात.