Exclusive

Ahmednagar Breaking : अहमदनगर मध्ये होणार 3 नवे उड्डाणपुल ! 125 कोटीचा निधी मंजूर, खा.सुजय विखे पाटलांचे जनतेला गिफ्ट !

Published by
Tejas B Shelar

Ahmednagar Breaking : अहमदनगर पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे 3 किलोमीटरचा भव्य उड्डाण पूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदार संघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी 3 उड्डाण पूल मंजूर झाले आहेत. नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर- मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक व याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा ती नव्या उड्डाण पुलांसाठी 125 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या तीन नव्या उड्डाण पुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजी नगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.

अहमदनगर-मनमाड रस्ता प्र. रा. मा. ०८ वरील डि. एस. पी. चौक अहमदनगर येथे उड्डाणपुलाच्या बांधकामास ७१ कोटी रुपयांच्या निधी तसेच या रस्त्यावरील सह्याद्री चौक आणि सनफार्मा चौक येथे देखील दुपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामास ५२ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या निधीमध्ये नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम, सेवा रस्ता व पोहोचमार्गाचे बांधकाम तसेच संकीर्णबाबी आदी गोष्टींचा समावेश असेल. दरम्यान अहमदनगर वासियांसाठी ही महत्वाची बातमी असून वाहतुकीच्या कोंडीमुळे येथे मोठा अडथळा निर्माण होत होता आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता तो त्रास दूर होणार आहे असे मत मांडून खासदार विखेंनी सदरील निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला.

या नगर-मनमाड हायवेवर उड्डाणपुलाची निर्मिती होणे ही काळाची गरज होती. कारण नगर शहरात प्रवेश करताना सनफार्मा, सह्याद्री चौक आणि डि. एस. पी. चौक येथे प्रचंड ट्रॅफिक निर्माण होत होती. त्यामुळे उसळणारी वाहनांची गर्दी ही डोकेदुखी ठरत होती. तातडीच्या कामांसाठी जाणाऱ्या किंवा येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता.

हे ओळखून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी इच्छा होती. त्यासाठी वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा देखील पालकमंत्री साहेबांच्या व माझ्या वतीने सुरू होता. अखेरीस आज शासन निर्णय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच नागरिक या समस्येपासून सुटकेचा श्वास घेतील यात कसलीही शंका नाही असे देखील मत खासदार सुजय विखेंनी यावेळी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे या कामासाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी आभार मानले. तसेच महायुती सरकारच्या काळात अशी अनेकविध विकासकामे ही प्रचंड वेगाने मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त केले.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com