Ahmednagar District :- अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. तसे पहिले तर राज्यात अनेक जिल्ह्यात अशी विभाजनाची मागणी आहे. पण अहमदनगरचा विचार केला तर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे.
त्यामुळे शासकीय, प्रशासकीय दृष्ट्या या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. परंतु हा मुद्दा अनेक वर्षांपासून केवळ भिजत घोंगड़े आहे. परंतु आता यावर आ. राम शिंदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
मोदींच्या हस्ते २६ तारखेला होणाऱ्या महसूल प्रशासन इमारतीचे भूमीपूजन म्हणजे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल आहे असे ते म्हणाले आहेत. अहमदनगर मधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ. राम शिंदे म्हणाले की, राज्याच्या गेल्या अर्थसंकल्पात अहमदनगर जिल्ह्यासाठी अपर जिल्हाधिकारी पद निर्मिती करण्यात आली असून त्याचे मुख्यालय बदलून शिर्डी करण्यात आले आहे. अहमदनगर मध्ये महसूल प्रशासनाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
त्यासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे सगळे म्हणजे जिल्ह्याच्या विभाजनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. त्यामुळे आता खरोखर जिल्हा विभाजन होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
वाद होण्याची शक्यता
जिल्हा विभाजन झाला तर शिर्डी येथे जिल्ह्याचे मुख्यालय होऊ शकते. कारण प्रशासकीय कार्यालये हे सध्या शिर्डीत उभी केली आहेत. परंतु नवीन जिल्ह्याचे केंद्र हे श्रीरामपूर असावे असे अनेकांचे मागणे आहे.
यासाठी श्रीरामपूरकर आंदोलनालाही बसलले होते. त्यामुळे जिल्हा विभाजन झाला व त्याचे मुख्यालय शिर्डी झाले तर पुन्हा एकदा नवा वाद उभा राहू शकतो असे चित्र दिसते.