Exclusive

अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ह्या पाच नेत्यांची नावे चर्चेत ! कोणाला मिळणार दक्षिणेतून उमेदवारी । Ahmednagar Lok Sabha

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Lok Sabha :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तयारीचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावून नगर दक्षिण लोकसभेसंदर्भात चाचपणी केली. नगर दक्षिणेतून आ. निलेश लंके, माजी आमदार अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, घनश्याम शेलार यांच्या नावाची चर्चा झाली. प्रभावी व तुल्यबळ उमेदवार कोण राहील? या संदर्भातची मते खा. पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा मंगळवारी आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, घनश्याम शेलार, बाळासाहेब जगताप, राजेंद्र कोठारी, युवक कपिल पवार, संजय कोळगे आदी उपस्थित होते.

हे दोन नेते बैठकीस अनुपस्थित
मुंबईतील बैठकीस विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ खा. सुनिल तटकरे, खा. श्रीनिवास पाटील, जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आ. संग्राम जगताप, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आ. दादाभाऊ कळमकर, माजी आ. राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, घनश्याम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी आदी नेतेमंडळी उपस्थित होते. चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वतयारीमुळे आ. रोहित पवार तसेच कुटूंबातील लग्न सोहळ्यामुळे आ. निलेश लंके बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.

उमेदवारीसाठी यांची नावे चर्चेत
लोकसभेसाठी आमदार नीलेश लंके हे उमेदवार असतील, असे मानले जात होते. परंतु, त्यांच्याशिवाय इतर नावांवरही बैठकीत चर्चा झाली. फाळके यांनी सर्वसामान्याला संधी देण्याची मागणी केली तर बाळासाहेब जगताप यांनी आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. लोकसभेचा मतदारसंघ मोठा आहे. आमदार जगताप यांनी गतवेळी कमी वेळेत प्रचार करीत मते घेतली. त्यांना प्रचारासाठी वेळ मिळाल्यास ते निवडणूक जिंकू शकतील, असा दावा बाळासाहेब जगताप यांनी केला.

तातडीने लोकसभेचा उमेदवार जाहीर करा…
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी राजेंद्र कोठारी यांनी केली. त्यांचा दक्षिणेत जनसंपर्क आहे. त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोठारी यांनी बैठकीत केली. याशिवाय घनश्याम शेलार व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या नावांची बैठकीत चर्चा झाली. पक्षाने तातडीने लोकसभेचा उमेदवार जाहीर करावा, जेणेकरून तयारीसाठी वेळ मिळेल, अशी मागणी माजी आमदार राहुल जगताप यांनी वरिष्ठांकडे केली .

निवडणूक पूर्ण ताकदीने लढून जिंकायची – खा. पवार
लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढून जिंकायची आहे, असे आवाहन खा. पवार यांनी कार्यकत्यांना केले. नगर दक्षिण लोकसभेप्रमाणेच राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघाची चाचपणी खा. पवार यांनी केली. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीची आतापासूनच चाचपणी सुरु झाल्याने इच्छुकांच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या राजकिय वाटाघाटीत नगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे.

त्या पराभवाचा वचपा कसा भरुन काढणार ?
२०२४ च्या निवडणुकीतही ही जागा राष्ट्रवादीकडेच राहील, असे गृहित धरुन राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरु केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आ. संग्राम जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. आ. जगताप यांचा भाजपचे खा. सुजय विखे यांनी पराभव केला होता. २०१९ च्या पराभवाचे शल्य राष्ट्रवादीच्या वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांना बोचत असून, त्या पराभवाचा वचपा कसा भरुन काढणार, यावर पक्षश्रेष्ठींचा भर असल्याचे दिसून येते.

गद्दारांना घडा शिकविण्याची मागणी
जिल्हा सहकारी बँकेत पक्षाचे संचालक फुटले. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे काहीही केले तरी चालते.पक्ष कुठलीही कारवाई करीत नाही, असा संदेश गेला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील फुटलेल्या संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी कपिल पवार, संजय कोळगे, बाळासाहेब जगताप यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24