Ahmednagar News : डोक्यावर पेटलेले कठे..उसळणाऱ्या तप्त ज्वाला.. शरीरावर ओघळते उकळते तेल… अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी पंरपरा

Ahmednagarlive24 office
Published:
kauthevadi

Ahmednagar News : डोक्यावर पेटलेले कठे… त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला… शरीरावर ओघळणारे उकळत तेल… मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष… अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध चित्कार.. हा थरार असतो अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील कौठेवाडीतील बिरोबाच्या यात्रेत. अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरत असते.

महाराष्ट्रातीच्या धार्मिक संस्कृतीचा विचार केला तर धार्मिक स्थळे आणि तेथील भागातील देवस्थानांची प्रथा परंपरा या खूपच अनोख्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही अशी विविधरूपी धार्मिक संस्कृती अद्यापही टिकून आहे.

यातीलच एक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कौठेवाडी या गावातील बिरोबाची यात्रा. ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असून डोक्यावर लाल निखाऱ्याची तेवत असलेली मातीची घागर घेऊन भाविक भक्त बिरोबाच्या मंदिराला फेरा मारतात.

कठा म्हणजे काय?
कठा म्हणजे मातीची घागर की जी बुडाच्या बाजूने कापली जाते. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवून खैराची ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकडे या घागरीत उभी भरली जातात.

त्यात कापूर, कापूस टाकले जातात. बाहेरच्या बाजूने नवीन को-या कपड्याने त्याला घट्ट बांधून मग त्याला फुलांचा हार घालत आकर्षक सजावट केली जाते. यामध्ये नवस केलेल्या व्यक्तीचे नाव नमूद केलेले असते.

काय आहे आख्यायिका
ही प्रथापंरा कधी सुरू झाली याची खात्रीलायक माहिती जरी नसली तरी एका कथेनुसार बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील असून शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा काही लोक कौठेवाडी येथे आले होते. येताना आपला दगडरुपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जावू लागले तेव्हा लहानसा दगड काही केल्याने हलेना.

तेव्हा हा प्रांत जाहगिरी खाली होता. येथिल जाहगिरदारानं भोईर आणि भांगरे यांना येथे कसण्यास जमीन देवून येथेच स्थायिक होण्यास सांगितले तेव्हापासून ही प्रथा असल्याचे सांगितले जाते.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी आलेली होती. तेव्हा त्यांच्यावर आलेल संकट बिरोबाच्या नवसाने नष्ट झाल्याने तेव्हापासून ही महाराष्ट्रातील कठ्याची परंपरा सुरू आहे असे म्हटले जाते.

दूरवरून येतात भाविक
या यात्रेसाठी मुंबई, ठाणे सह अनेक जिल्ह्यातून भाविक येथे येत असतात. भाविक याठिकाणी बिरोबाला नवस करतात. हा नवस पूर्ण झाला की कठा अर्पण करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe