Ahmednagar Politics : आगामी लोकसभेसाठी अहमदनगर मतदार संघात आमदार निलेश लंके हे खा. सुजय विखेंना विरोधक असणार हे जवळपास फिक्स दिसतंय. जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा स्वतः शरद पवारांनी आ. लंके यांना पाठबळ दिल होत.
आता अजित दादा गट भाजपसोबत आहे. असे असले तरीही अजित पवार यांनी लंके याना लोकसभेसाठी पाठबळ दिल्याचं बोललं जात आहे. अजित दादा गट सध्या भाजपसोबत आहे. असे असूनही सहकारी पक्ष असूनही याच सहकारी पक्षाकडून विखे यांना आव्हान मिळत आहे.
अजित पवार जरी भाजपसोबत असले तरी आगामी येऊ घातलेल्या लोकसभेसाठी ज्या काही मोजक्या जागांवर अजित पवार गटाचा दबदबा असणार आहे त्यात नगर दक्षिणेची जागा महत्वाची मानली जात आहे. अजित पवार यांना राज्यात आणि केंद्रात वजन वाढवायचे असेल तर त्यांना लोकसभेत प्रतिनिधी वाढावे लागेल. त्यामुळे लंकेना लोकसभेसाठी मूक समंतीद्वारे पुढची ‘चाल’ खेळू देत असल्याच बोलले जात आहे.
दुसरीकडे आ. राम शिंदे हे भाजपचेच आमदार आहेत. परंतु ते देखील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. तसे त्यांनी सूतोवाच देखील केले होते.
अजित पवार राष्ट्रवादीमधून बंड करून बाहेर येण्यापूर्वीही आ. राम शिंदे यांनी 2024 लोकसभेसाठी पक्ष श्रेष्ठीकडे लोकसभेसाठी मागणी केल्याचे समोर आले होते. त्यांनी मात्र आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपण 2014 पासून लोकसभा उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी करतोय असे सांगून ते मोकळे झाले आहेत.
अडीच वर्षांपूर्वी पारनेर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील वाढती लोकप्रियता यावर भाष्य करून आपण जिल्ह्याचे नेतृत्व करू शकता, असे सांगितले होते. त्याचवेळी प्रसारमाध्यमांनी लंके यांना खासदार म्हणून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला होता.
आमदार निलेश लंके यांनी आपली बाजू मांडताना पक्ष देईल तो आदेश असे उत्तर दिले. लोकसभा नगर दक्षिणेत प्रबळ उमेदवाराअभावी पक्षाचा येऊ घातलेला पराभव पाहता लोकसभेसाठी राष्ट्रवादीने लंकेना फायनल करून साहेबांनी कामाला लागा असे आदेश दिले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील बंडाळीनंतर आ. लंके हे अजित दादा गटासोबत गेले.
नगरच्या दक्षिण जागेवरून भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी याच नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे विद्यमान खासदार असताना राम शिंदे यांनी मोठा दावा केला होता.
मात्र, अजित पवार महायुतीसरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका कायम असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी राम शिंदे यांचा या जागेसाठी किती आग्रह आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
एकंदरीतच अहमदनगर दक्षिण मधील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आगामी लोकसभा निवडणूक खासदार सुजय विखेंसाठी ‘अवघड’ ठरू शकते. महायुती मध्ये तीन पक्ष आणि इच्छुकांची गर्दी यामुळे आता खा. सुजय विखे यांच्यासमोर 2024 च्या लोकसभा उमेदवारीसाठी एकीकडे महायुतीतील सहकारी पक्षाचे तर दुसरीकडे पक्षातीलच आमदाराचे आव्हान असेल असे चित्र तरी सध्या दिसत आहे.