Exclusive

अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा ! माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Babanrao Dhakne Passed Away : अहमदनगर जिल्ह्यातून आताच्या क्षणाला एक वाईट बातमी आली आहे.माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे निधन झाले.

बबनराव ढाकणे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात मागील काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ढाकणे हे निमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर मध्ये खाजगी उपचार घेत होते. त्यात त्यांची प्रकृती खालावली. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले आहे.

बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये झाला. जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यात एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले.

बबनराव ढाकणे यांनी बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला.

महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते.

महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या.

तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री होते.

दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक पर्यंत ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दिवंगत ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24