अमेरिकन सैन्यात तृतीयपंथीयांच्या भरतीला बंदी !

Published on -

२९ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत तृतीयपंथी सैनिकांसंबंधीच्या धोरणात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अमेरिकन सैन्यामध्ये तृतीयपंथी सैनिकांच्या भरतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सोबतच कोरोना महामारी दरम्यान लस घेण्यास नकार दिल्यामुळे काढून टाकण्यात आलेल्या सैनिकांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेची सत्ता हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एका अध्यादेशाद्वारे अमेरिकेत तृतीय पंथीय ही संकल्पनाच रद्द करण्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी आता अमेरिकन सैन्याचे दरवाजे तृतीयपंथीयांसाठी बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत ट्रम्प यांनी संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांना तृतीयपंथी सैनिकांसंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे येत्या काळात तृतीयपंथीयांसाठी सैन्य भरतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. तृतीयपंथी सैनिकांमुळे एका जवानाच्या ‘सन्मानजनक, सत्यनिष्ठ आणि शिस्तबद्ध जीवनशैली’ सोबत प्रतिकूल स्थिती निर्माण होते. सोबत सैन्य सज्जतेच्या दृष्टिकोनातून ही नुकसानदायक बाब असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात देखील तृतीयपंथी सैनिकांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता.

पण हे प्रकरण अनेक वर्षे न्यायालयात अडकून पडले होते. नंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांचा आदेश बदलला होता. तर ट्रम्प यांच्या ताज्या आदेशाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार तृतीयपंथी सैनिकांच्या वकिलांनी व्यक्त केला आहे. शिवाय ट्रम्प यांनी कोरोना लस न घेतल्यामुळे सैन्यातून काढून टाकलेल्या सैनिकांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!