Exclusive

फोनच्या मॉडेलनुसार आकारले जाते कॅबचे प्रवास शुल्क ? ओला, उबर कंपन्यांना स्पष्टीकरणासाठी केंद्राची नोटीस

Published by
Sushant Kulkarni

२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : रिक्षा, टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलच्या मॉडेलनुसार शुल्क आकारत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या आरोपाची दखल घेत कॅब अँग्रीगेटर्स ओला आणि उबर या कंपन्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहेकेंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स सोशल मीडियावरून नोटीसबाबतची माहिती दिली.

उबर आणि ओला कंपनी ग्राहकांना वेगवेगळ्या मोबाईल फोनच्या (आयफोन किंवा अँड्रॉइड) वापरानुसार प्रवास भाडे आकारत असल्याचे निदर्शनास आल्याच्या वृत्ताची ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दखल घेतली आहे.कंपन्यांनी सीसीपीएच्या माध्यमातून त्यांची शुल्क आकारण्याची पद्धत स्पष्ट करावी आणि संभाव्य भेदभावा बाबत खुलासा करावा.भाडे आकारणीतील पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी तपशीलवार माहिती सादर करावी,असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

दिल्लीतील एका उद्योजकाने गत महिन्यात एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, कॅब सेवा देणारी कंपनी एकाच ठिकाणाच्या प्रवासासाठी वेगवेगळे शुल्क आकारत असल्याचा दावा केला होता.तुम्ही कॅब बुक करताना अँड्रॉइड फोन वापरता की आयफोन, यावरून शुल्क ठरत असल्याचे या उद्योजकाचे म्हणणे होते.आपल्या आरोपादाखल त्याने दोन फोटोदेखील शेअर केले होते. यामध्ये एकाच ठिकाणी जाण्याकरिता उबर अॅपमध्ये वेगवेगळे भाडे दाखवण्यात येत असल्याचे दिसते.

एका सर्वेक्षणानुसार अॅपलच्या आयफोनचे सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर ६० टक्के आयफोन युजर्सना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये कॉल न लागणे, कॉल कट होणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सहभागी ९० टक्के युजर्सनी यासाठी अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिममधील नवीन अपडेटला जबाबदार ठरवले आहे. ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने याची दखल घेत अॅपलला नोटीस बजावली आहे. अॅपलने स्क्रीन, कॅमेरा फ्रीज होण्याच्या समस्येवर ऑक्टोबर महिन्यात आयओएसला अपडेट दिले होते.

Sushant Kulkarni