Date Farming:- प्रयोगशीलता हा गुण सर्वच क्षेत्रात महत्वाचा असा गुण असून यामुळे अनेक नवनवीन गोष्टी उदयास येतात. अगदी याच पद्धतीने कृषी क्षेत्रात देखील अनेक प्रयोगशील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी कधी हे प्रयोग एखाद्या वाणाच्या बाबतीत केले जातात तर कधी कधी नवनवीन पीक लागवडीचे संदर्भात केले जातात. कृषी क्षेत्र आता नुसते उदरनिर्वाह पुरते राहिले नसून ते एक व्यवस्थित दृष्टिकोनातून विस्तारत असून त्या दृष्टिकोनातून अनेक नवनवीन पीक लागवडीचे प्रयोग देखील केले जात आहेत.
नुसते प्रयोगच केले जात नसून ते यशस्वी करण्याचे महत्त्वाचे काम देखील शेतकऱ्यांकडून होत आहे. अशाच एका प्रयोगाशीलतेचे उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील तनवाडी येथील दामोदर शेंडगे नावाचे शेतकरी होय. जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्याचा विचार केला तर प्रामुख्याने ऊस आणि मोसंबी उत्पादनासाठी प्रामुख्याने ओळखला जातो. परंतु या परिसरातील दामोदर शेंडगे यांनी यांच्याकडे असलेल्या 11 एकर शेत जमिनीपैकी तीन एकर क्षेत्रावर खजूर पिकाची लागवड यशस्वी केली आहे. त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
दामोदर शेंडगे यांची खजूर शेती
याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात असलेले तनवाडी येथील शेतकरी दामोदर शेंडगे यांनी मका आणि ऊस या पिकाला फाटा देत एकूण 11 एकर क्षेत्रापैकी तीन एकर क्षेत्रावर खजूर पिकाची लागवड यशस्वी केली असून परिसरामध्ये हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. खजूर शेतीची कल्पना त्यांना कशी सुचली? यामागे देखील एक कारण आहे. जालना जिल्ह्यातील परतुर या ठिकाणी असलेल्या साखर कारखान्यासमोरून ते एकदा जात असताना या कारखान्याच्या परिसरामध्ये त्यांना सोनेरी गुच्छ असलेली झाडे दिसली.
त्यामुळे त्यांच्या मनात आले की ही कुठली शोभिवंत झाडे आहेत याबद्दल त्यांनी कारखान्यात जाऊन विचारपूस केली. तेव्हा त्यांना कळले की ही शोभेची झाडे नसून खजुराची झाडे आहेत. लागलीच त्यांच्या डोक्यात आले की जर खजुराची झाडे या ठिकाणी टिकाव धरू शकतात तर शेतीत लागवड केल्यावर देखील ते चांगल्या पद्धतीने टिकू शकतील. मग त्यांनी यासंबंधीची सखोल चौकशी केली. यामध्ये रोपे कुठून आणली व कोणत्या व्यक्तीकडून आणली? इत्यादी माहिती घेतली व ज्या व्यक्तीकडून खजुराची रोपे कारखान्याने आणलेली होती त्या व्यक्तीची संपर्क साधून त्याला स्वतःची शेती दाखवली आणि या मातीत हे पीक येईल का असे देखील विचारले. त्यानंतर या व्यक्तीने या ठिकाणी हे पीक उत्तम मिळेल असा विश्वास दिला व दामोदर शेंडगे यांनी घरी चर्चा केली व खजूर लागवड करण्याचे निश्चित केले.
अशा पद्धतीने केली सुरुवात
खजूर लागवड करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी गाडी काढून थेट गुजरात राज्यातील कच्छ या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जाऊन तिथली खजूर लागवड त्यांनी व्यवस्थित पाहिली व अभ्यासली. परत येताना 180 खजुराची टिशू कल्चर रोपे 3250 रुपये प्रति नग याप्रमाणे विकत घेतली व ते लागवडीसाठी घेऊन आले. साधारणपणे हे घटना 2019 यावर्षीची असून 12 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांनी त्यांच्या तीन एकर जमिनीवर 25 बाय 25 च्या अंतरावर या दोनशे रोपांची लागवड केली. लागवडीनंतर खत व्यवस्थापनावर जोर देताना त्यांनी फक्त शेणखताचा वापर करण्याचे ठरवले व एका वर्षात दोन वेळेस शेणखत दिले.
या कालावधीमध्ये त्यांना खजूर पिकासाठी कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी किंवा कुठलेच रासायनिक खत व औषध यांची मात्रा देण्याची गरज भासली नाही. खजुराची लागवड केल्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर या झाडाला चांगल्या प्रकारे मोहर आला व एक जानेवारी 2023 ला झाडावर फुले उमलली व त्यानंतर फळ लागायला सुरुवात झाली. साधारणपणे जून महिन्याच्या कालावधीमध्ये ही फळे काढणीस तयार झाली. पहिल्या तोडणीच्या वेळेस एका झाडावर 50 किलो ते एक क्विंटल इतके फळे निघायला सुरुवात झाली व आता दरवर्षी हे प्रमाण वाढेल असे देखील दामोदर शेंडगे यांनी सांगितले.
अशा पद्धतीने केले विक्री व्यवस्थापन
खजुराची विक्री व्यवस्थापन करताना त्यांनी पिकेल तिथेच विकेल या सूत्राचा अवलंब केला व यांचे शेत रस्त्यावर असल्यामुळे त्यांनी शेतासमोरच स्टॉल लावून विक्री करायला सुरुवात केली. त्यामुळे येणारे जाणारे प्रवासांनी कुतूहलाने हे कोणते फळ आहे याची चौकशी केली व चौकशी करायला आलेल्या प्रवाशाला ते एक फळ खायला द्यायचे. या पद्धतीने प्रत्येक ग्राहक अर्धा ते एक किलो पर्यंत खजूर विकत घेतो.
आतापर्यंत त्यांनी चार ते साडेचार टन खजुराचे उत्पादन घेतले असून प्रति किलो दोनशे रुपये दराने विक्री केली आहे. विक्रीतून त्यांना आतापर्यंत सात ते आठ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असून अजून देखील झाडावर बरेच खजूर शिल्लक असल्यामुळे अजून देखील उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. अशा पद्धतीने दामोदर शेंडगे यांनी केलेला हा आधुनिक प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्यामुळे इतर शेतकरी देखील आता खजूर लागवडीकडे वळू लागले आहेत. प्रामुख्याने दुष्काळी पट्टा असणाऱ्या या भागात देखील खजूर शेती शेंडगे यांनी मोठ्या कष्टाने फुलवली व यशस्वी केली. यामध्ये त्यांना त्यांच्या मुलाचे मोलाचे सहकार्य लाभले व खजूर शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन त्यांचा मोठा मुलगा बघतो.