Ahmednagar News : अहमदनगर शहरावासीयांसाठी एक खुशखबर आली आहे. आता अहमदनगर शहरात इलेक्ट्रॉनिक बस धावणार आहेत. केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पी.एम. ई-बस सेवा योजनेत अहमदनगर शहराचा समावेश झाला आहे.
त्यामुळे आता येत्या काही दिवसांत शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रॉनिक बस धावताना दिसतील. ग्रीन मोबिलिटी आणि हवामान बदल लक्षात घेऊन सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.
या अनुशंगाने केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑगस्ट २०२३ रोजी पी.एम. ई-बस सेवेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत देशातील ३ लाख व त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात अहमदनगरचा समावेश
देशातील ३ लाख व त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पहिल्याच टप्यात नगर शहराचा समावेश झाला आहे. ही योजना नगर शहरात सुरू करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली आहे.
महापालिकेचे जलअभियंता परिमल निकम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पी. एम. ई-बस सेवा योजनेत नगर शहराचा समावेश झाला आहे. ही सेवा शहरात सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
कधी सुरु होणार इलेक्ट्रिक बस
परिमल निकम यांनी याबाबतही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. राज्य शासनाकडून केंद्राकडे अहवाल गेल्यानंतर याबाबत पुढील प्रक्रिया होणार आहे. मात्र, यासाठी किती अवधी लागेल हे सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.
महानगरपालिका लवकरच राज्याकडे प्रकल्प अहवाल पाठवणार
– शहराची लोकसंख्या, रस्त्यांची लांबी, शहराचा आकार, सध्याची वाहतूक व्यवस्था,
– शहरात पीएमई-बस सुरू करण्यासाठी किती बसेसची आवश्यकता भासणार याचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेकडून तयार करण्यात येणार आहे.
– हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्याने केंद्राला अहवाल दिल्यानंतर शहरात ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
– ई-बस केंद्र शासनाकडून पुरविल्या जाणार आहेत. दरम्यान ही बससेवा खासगी संस्थेला चालविण्यास देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.