Exclusive

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेऊन नियोजन करा ! मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश ; आजपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया

Published by
Sushant Kulkarni

२४ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे.तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी.तसेच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी,असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.हमीभावाने ३०० केंद्रांवरून तीन लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे तूर खरेदी प्रक्रियेसंदर्भातील आढावा बैठक झाली.बैठकीस एन.डी. श्रीधर दुबे-पाटील, कार्यकारी संचालक (मार्केड), भाव्या आनंद, राज्यप्रमुख (नाफेड), प्रशांत बसवकर, उपव्यस्थापक, एमएसडब्ल्यूसी, डी.आर. भोकरे, व्यवस्थापक (मार्केड) यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. ‘नाफेड’ अंतर्गत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन तसेच विदर्भ मार्केटिंग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पणन मंत्री रावल म्हणाले की, राज्यभरात सुरुवातीला तीनशे खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विनाअडथळा तूर खरेदी नोंदणीची तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी यंत्रणेने घ्यावी. वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनने खरेदी प्रक्रियेतील काम जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पेमेंट जमा करण्यास अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

याकामी अधिकचे मनुष्यबळ लागत असल्यास त्याची व्यवस्था करावी.त्याचसोबत खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना पाण्याची,बसण्याची सुयोग्य व्यवस्था, तक्रार निवारण केंद्राची सुविधा उपलब्ध करावी.याठिकाणी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी.जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी या सर्व बाबींचे नियंत्रण करून तक्रारींचे निवारण करावे.

तूर खरेदीच्या दृष्टीने वेअरहाऊसची नियोजन व्यवस्था तयार ठेवावी.. त्यासाठीची आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. त्याठिकाणी डेटा एण्ट्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात यावी. शेतकऱ्यांनी डेटा एण्ट्री केल्यानंतर पुढच्या ७२ तासांत नाफेडमार्फत नियमानुसार त्यांना पैसे प्राप्त होतील, याची काळजी घ्यावी. खरेदी नोंदणीची तसेच खरेदी सुरू झाल्यानंतर त्याबाबतची प्रक्रिया गतीने सुव्यवस्थितरीत्या पार पाडण्याच्या सूचना यावेळी पणन मंत्री रावल यांनी दिल्या.

Sushant Kulkarni