३१ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : विमानतळावर उतरताना एक प्रवासी विमान व सैन्य हेलिकॉप्टरची हवेतच धडक होऊन नदीत कोसळल्याची विचित्र दुर्घटना अमेरिकेत घडली. विमानातून ४ क्रू सदस्यांसह ६४ जण, तर हेलिकॉप्टरमधून ३ जवान असे एकूण ६७ जण प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर तातडीने नदीपात्रात युद्धपातळीवर बचाव अभियान राबवले जात आहे. आतापर्यंत २८ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
दुर्घटनेची भीषणता पाहता कोणीही बचावण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुर्घटनेतील पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टननजीकच्या रोनाल्ड रिगन राष्ट्रीय विमानतळाजवळ बुधरात्री रात्री ही दुर्घटना घडली.अमेरिकन एअरलाइन्सचे सीआरजे ७०० बॉम्बार्डियर जेट प्रवासी विमान कन्सास राज्यातील विचिटाहून वॉशिंग्टनला निघाले होते.
यादरम्यान, विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना विमानाची आणि सैन्याच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाली. यानंतर स्फोट होऊन ते विमानतळानजीकच्या पोटोमॅक नदीत कोसळले.हेलिकॉप्टरने प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते. दुर्घटनेपूर्वी हवाई नियंत्रकाने विमानाला लहान धावपट्टीवर उतरण्यास सांगितले होते. वैमानिकाने त्यासाठी तयारी दर्शवली होती, तर हेलिकॉप्टरला विमानाच्या मागून जाण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या उड्डाणास काही सेकंदाचा उशीर झाल्याने विमानाची आणि त्याची हवेतच टक्कर झाल्याचे समजते.
घटनेच्या व्हिडीओमध्ये विमान व हेलिकॉप्टरची टक्कर झाल्यानंतर हवेत आगडोंब उसळल्याचे दिसून येत आहे. दुर्घटनेनंतर तातडीने युद्धपातळीवर बचाव अभियान राबवले जात आहे. बचाव मोहिमेमध्ये हेलिकॉप्टर, नौका आणि गोताखोरांचा समावेश आहे. पण पाण्याची खोली अधिक असल्याने बचाव मोहीम ही आव्हानात्मक ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.
या दुर्घटनेनंतर विमानतळावरील उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. या घटनेमुळे १३ जानेवारी १९८२ रोजी एअर फ्लोरिडाच्या विमान दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या. प्रतिकुल वातावरणामुळे हे विमानदेखील पोटोमॅक नदीत कोसळले होते. यामध्ये ७८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता