Exclusive

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभेत पुण्यातून निवडणुक लढणार ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Pune Politics : पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासोबतच पुढल्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये शासनाने सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

नुकताच 30 ऑगस्ट रोजी केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील माता भगिनींना दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आज कमर्शियल सिलेंडर दीडशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकूणच महागाईने होरपळलेल्या जनतेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून दिलासा देण्याचे काम केले जात असून निवडणुकीत सर्वसामान्यांना साधण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून फेकण्यात आला आहे. यावरूनच येत्या निवडणुकीसाठीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत हे स्पष्ट होत आहे.

शासन स्तरावर सर्वसामान्यांना साधण्याचा डाव शासनाकडून आखला जात आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी देखील आत्तापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेससह इतर अनेक प्रमुख पक्षांनी लोकसभेची पूर्वतयारी सुरू केली आहे.

लोकसभेचे मैदान मारण्यासाठी आत्तापासूनच राजकीय नेत्यांनी शड्डू ठोकला आहे. पुण्यातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. दरम्यान पुण्याचा राजकीय आखाडा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच रंगणार असे चित्र तयार होत आहे.

कारण की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. दरम्यान या चर्चेनंतर पुणेकरांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. एकीकडे, पुण्यातून नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे पुणे भाजपने मोदी यांनी पुण्यातूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात पुण्यातील भाजपचे जेष्ठ नेते संजय काकडे यांनी मोदींशी पत्रव्यवहार केला आहे. संजय काकडे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांस्कृतिक राजधानी पुण्यातून निवडणूक लढण्याची मागणी केली आहे. तसेच काकडे यांनी मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर इतिहासात आत्तापर्यंत एवढा मोठा विजय कोणीच मिळवला नसेल इतका मोठा विजय आम्ही पुण्यातून मिळवू, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू अशी मन की बात बोलून दाखवली.

मोदींनी हा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 48 जागेवर आमच्याच खासदार निवडून येतील असे सांगितले. मोदींनी हा निर्णय घेतला तर पुण्याचे नव्हे नव्हे तर महाराष्ट्राचे भाग्य उजळेल असेही ते म्हणाले. तसेच ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश मधून काशी विश्वनाथ प्रभूच्या नगरीतून नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवल्यानंतर तेथील 90% जागा भाजपला जिंकता आल्या त्याचं प्रमाणे पुण्यातून मोदी रिंगणात उतरले तर महाराष्ट्रातील 100% लोकसभेच्या जागा भाजपला जिंकता येतील असेही ते म्हटले.

एकीकडे पुणे भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणूक लढवण्यास राजी झाले तर काय होऊ शकते याचे बखान करण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे पुण्यातून मोदींनी निवडणूक लढवली तर मोदीविरोधात आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू असे म्हणतं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही आपली मन की बात बोलून दाखवली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24