Snake Bite Death:- सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून भारतामध्ये दरवर्षी जर साप चावल्यामुळे मृत्यूमुखी होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण पाहिले तर ते साठ हजार पेक्षा देखील जास्त आहे. साधारणपणे साप चावल्याच्या घटना या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोकांचे शेतीशी निगडित कामे असल्यामुळे त्यांना शेतात जायला लागते.
बऱ्याचदा रात्री-बेरात्री देखील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी बंधूंना शेतात जायला लागते व अशाप्रसंगी साप चावल्याच्या घटना घडतात व लोकांना प्राण गमवावा लागतो. तसेच ग्रामीण भागामध्ये वेळेवर पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने देखील या घटनांचे प्रमाण जास्त आहे.
त्या अनुषंगाने जर आपण डॉक्टर सदानंद आणि डॉक्टर पल्लवी राऊत यांचे कार्य पाहिले तर त्यांनी आतापर्यंत जवळपास 6000 पेक्षा जास्त साप चावलेल्या व्यक्तींचे जीव वाचवलेले आहेत. विशेष म्हणजे हे दाम्पत्य सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत.
या दाम्पत्याने सांगितले साप चावून मृत्यू होण्यामागील प्रमुख कारण
याबाबत प्रसिद्ध मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे शहराच्या भागात असलेल्या उंब्रज या गावातील डॉक्टर राऊत यांनी 1992 यावर्षी जनरल मेडिसिनमध्ये पदवी घेऊन ते उत्तीर्ण झाले व आदिवासी भागांमध्ये त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. या राऊत दाम्पत्यांनी आजपर्यंत जे काही सर्पदंश झालेल्या व्यक्तींचे प्राण वाचवले त्यामागे एक मोठा प्रसंग असून तो म्हणजे त्यांच्या मित्राच्या शेतामध्ये काम करणाऱ्या एका आठ वर्षाच्या मुलीला सापाने चावा घेतला.
नंतर त्या मुलीला प्रचंड प्रमाणात त्रास व्हायला लागला व श्वास घेणे देखील कठीण व्हायला लागले. ही गोष्ट त्या शेतावरील एका कर्मचाऱ्याने डॉक्टरांना कळवली व डॉक्टरांनी त्या मुलीला पटकन हॉस्पिटलमध्ये आणण्याचे सांगितले. जोपर्यंत ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आली तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.
या एकच घटनेमुळे राऊत दाम्पत्याने निर्णय घेतला की आता गावामध्ये एकाही व्यक्तीला साप चावल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही व त्यांनी त्या संदर्भातच प्रॅक्टिस सुरू केली. जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये इंडियन कोब्रा तसेच रसेल वायपर व कॉमन क्रेट, स्केल्ड वायपर यासारख्या विषारी सापांच्या चाव्यामुळे लोकांचे मृत्यू होतात. या प्रकारचा साप चावल्यानंतर जर अँटिव्हेनम द्यायला उशीर झाला तरी रुग्णाचा मृत्यू होतो.
साप चावल्यावर काय करावे? डॉक्टरांनी दिलेली माहिती
याबाबत डॉ.सदानंद राऊत म्हणतात की, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साप चावल्यानंतर जितके लवकर रुग्णाला दवाखान्यात आणता येईल तितक्या लवकर आणायला हवे. कुठल्याही हकीम किंवा वैदयकडे जाऊन वेळ वाया न घालवता आणि त्यासोबतच ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या भागावर चावणे किंवा काही बांधू नये असे देखील डॉक्टर म्हणतात.
तसेच ज्या रुग्णालयात पेशंटला न्यायचे आहे त्या ठिकाणी डॉक्टर आणि अँटिवेनम उपलब्ध आहे की नाही हे देखील बघणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते जेव्हा सर्पदंश होतो तेव्हा लोक प्रचंड प्रमाणात घाबरायला लागतात व अशा घाबरण्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे ज्या रुग्णाला साप चावला आहे
त्या व्यक्तीला सांगायला पाहिजे की घाबरण्याचं काहीही कारण नाही अशा प्रकारची समजूत काढणे खूप गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे जर साप चावला तर व्यक्तीने चालणे किंवा धावणे टाळावे. जर असे केले तर सापाचे विष हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर रुग्णालय गाठणे खूप गरजेचे आहे असे देखील डॉक्टरांनी सांगितले.