Success Story :- पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांना फाटा देत शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर फायद्याची होताना दिसत आहे. बाजारपेठेचा कल ओळखून शेतीमध्ये पीक लागवडीचे नियोजन करणे तितकेच गरजेचे आहे. अगोदर उदरनिर्वाह पुरती शेती ही जी काही शेतीची संकल्पना होती ती आता दूर लोटली गेली असून आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती केली जाते.
याकरिता हरितगृह किंवा शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारचे भाजीपाला आणि फुलांची लागवड करून शेतकरी चांगल्या प्रकारे नफा मिळवत आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळून चांगला आर्थिक नफा मिळवणे आता शक्य झालेले आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने अवघ्या पंधरा गुंठ्यात झेंडू लागवड करून दीड लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. म्हणजेच कमीत कमी क्षेत्रात देखील उत्तम शेती करून चांगला पैसा कसा मिळवता येतो याचे उत्तम उदाहरण हे शेतकरी आहेत.
झेंडू शेतीतून दीड लाखाचा नफा
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या वालसा वडाळा या गावचे शेतकरी रमेश तेलंग्रे यांनी त्यांच्या शेती पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे निश्चित केले व बाजारपेठेचा बदलता ट्रेंड ओळखून आणि बाजारपेठेत नेमके काय विकले जाते हे लक्षात घेऊन झेंडू लागवड केली व झेंडूची शेती करायला सुरुवात केली. बऱ्याचदा आपण नवीन गोष्टींची सुरुवात करतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. याच पद्धतीने रमेश तेलंग्रे यांना देखील अनंत अडचणींना तोंड द्यायला लागले.
तसेच अनेक शेतकऱ्यांनी त्यांना सल्ला दिला की हे तुमच्याकडून होणार नाही किंवा तुम्हाला हे जमणार नाही. अशाप्रकारे त्यांचे मनाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु रमेश यांनी या गोष्टींकडे लक्ष न देता जोमाने कष्ट करत शेतीमध्ये असलेले काम चालू ठेवले. तर त्यांच्या आपण झेंडू लागवडीचे नियोजन पाहिले तर साधारणपणे तीन जून 2023 या तारखेला त्यांनी फक्त पंधरा गुंठाक्षेत्रामध्ये तीन हजार झेंडूंची रोपे लावली.
ही रोपे त्यांनी साडेतीन रुपये प्रतिरोप या दराने शिरसोली या ठिकाणाहून विकत घेतली. झेंडू शेतीमधील त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्या शेतापर्यंत रस्ता असल्यामुळे वाहने डायरेक्ट शेतात येत असल्याने फुले बाजारपेठेमध्ये अगदी वेळेवर पोहोचतात. तसेच मार्केटमध्ये फुले विक्रीला पाठवण्या अगोदर ते त्याचे शॉर्टिंग करतात व दर्जेदार फुलेच विक्रीला पाठवतात. या सगळ्या प्रयत्नांतून त्यांना झेंडू फुलांच्या विक्रीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले असून त्यांना आतापर्यंत दीड लाख रुपये निव्वळ नफा महिन्याची अपेक्षा आहे.
ही त्यांची झेंडूची लागवडीची पहिली वेळ असून यापुढे अनुभव आल्यानंतर यामध्ये चांगला नफा मिळेल यामध्ये शंका नाही. बाजारपेठेचा कल ओळखून जर तुम्ही पिकांची लागवड केली तर नक्कीच फायदा मिळतो हे रमेश तेलंग्रे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.त्यामुळे आधुनिक शेतीचे कास धरून आणि बाजारपेठेतील मागणी ओळखून जर शेती केली तर नक्कीच शेती परवडते हे यावरून स्पष्ट होते.