Exclusive

एका नराधमाचा अंत ! कोपर्डी गावातल्या नागरिकांमध्ये उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोपर्डीतील गुन्ह्यात जरी आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेमुळे फाशी मिळाली नसली तरी देवाने न्याय केला असून, त्याने स्वतः हूनच फाशी घेतली आहे. मात्र, अद्यापी दोन आरोपींना शिक्षा त्वरित मिळणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा आज कोपर्डीतील नागरिकांनी व पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.

कोपर्डी अत्याचार व हत्याकांडातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या आत्महत्येनंतर आज अनेकांनी समाधान व्यक्त करताना परमेश्वराचे आभार मानत एका नराधमाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, अद्यापही त्याचे दोन सहकारी न्यायालयीन लढाई लढत आपल्या शिक्षेपासून दूर आहेत, त्यांनाही त्वरित शिक्षा मिळावी, असे म्हंटले आहे.

दि. १३ जुलै २०१६ रोजी कोपडीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास नववीत शिकणारी मुलगी आपल्या आजोबांच्या घरून मसाला घेऊन सायकलवरून घराकडे निघाली होती.

त्यावेळी आरोपी शिंदे वाने तिला अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर खून केला. तिचे दोन्ही हात मोडलेले आढळून आले होते. आरोपी जितेंद्र शिंदे हा कोपर्डीतीलच रहिवाशी होता. तो गावातील वीटभट्टीवर कामाला होता. त्याचे आईवडीलही मजुरी करतात.

यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. जिल्हा न्यायालयात निकाल लागला. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल देत वा तीनही आरोपींना खून आणि बलात्कार, या आरोपांसाठी फाशीची शिक्षा सुनावली होती.

आरोपींनी या शिक्षेला वरील न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नव्हती. हे सर्व आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होते. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोपर्डी गावात व संपूर्ण महाराष्ट्रात अनेक वेळा आंदोलने झाली.

आताही जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना कोपर्डीतूनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याही आंदोलनात आरोपींना तातडीने फाशी द्यावी, ही मागणी करण्यात आली आहे.

त्यादरम्यानच आज सकाळी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला मुख्य आरोपी जितेंद्रने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेच्या आत्महत्येनंतर कोपर्डी गावातल्या नागरिकांमध्ये उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

देवाच्या दारी नक्की न्याय मिळतो, न्यायव्यवस्था आणि सरकार जरी या प्रकरणात तातडीने न्याय देऊ शकले नसले तरी मुख्य आरोपी शेवटी गळफासावर लटकलाच पण अद्यापी दोन आरोपी शिक्षेशिवाय आहेत, त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. तर याच प्रकारची भावना पीडितेच्या आईनेही व्यक्त केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24