बरेच व्यक्ती मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट घेतात. कारण जर आपण मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांचा विचार केला तर जागा कमी आणि लोकसंख्या जास्त झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिक हे गगनचुंबी इमारत उभारण्याकडे जास्त प्रमाणात भर देत आहेत. परंतु जेव्हा आपण फ्लॅट घेतो तेव्हा नेमका तो कोणत्या फ्लोअरवर किंवा कशा लोकेशनचा घ्यावा याबद्दल देखील बघणे खूप महत्त्वाचे असते.
नाहीतर फ्लॅट घेऊन मिळणाऱ्या आनंदापेक्षा त्यापासून उद्भवणारा त्रासच मनाला जास्त दाहक ठरू शकतो. त्यामुळे एखाद्या मोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर काही बाबी डोळ्यासमोर ठेवून फ्लॅटची निवड करणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तो फ्लॅट ग्राउंड फ्लोअर वर घ्यावा की टॉप फ्लोअरवर हे ठरवताना काही साधारण निकष लावून बघितले आणि तुम्हाला त्याप्रमाणे कोणत्या फ्लोअरवर फ्लॅट घेणे योग्य वाटेल तो तुम्ही घ्यावा. या दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत जे फ्लॅट घेताना तो कोणत्या फ्लोअरवर घ्यावा हे ठरवताना फायद्याच्या ठरू शकतील.
कसं ठरवाल फ्लॅट कोणत्या फ्लोअरवर घ्यायचा?
1- हवामानाचा विचार करणे ठरेल फायद्याचे– यातील पहिला मुद्दा जर आपण पाहिला तर तो हवामान आहे. कोणत्याही शहरांमध्ये जर तुम्हाला फ्लॅट खरेदी करायचा असेल तर अगोदर हवामानाचा विचार करून व त्याची पूर्ण काळजी घेऊनच फ्लॅटची खरेदी करावी.
तुम्हाला ज्या शहरांमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे व त्या शहरांमध्ये जर वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही ग्राउंड फ्लोअरची निवड करणे गरजेचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर दिल्ली एनसीआरचा विचार केला तर या ठिकाणी प्रदूषण जास्त असल्यामुळे या ठिकाणचे लोक हे ग्राउंड फ्लोअरवर फ्लॅट खरेदी करायला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात.
2- इमारतीच्या आजूबाजूचा परिसर– समजा तुम्ही फ्लॅट घेत असलेल्या अपार्टमेंट किंवा बिल्डिंगच्या सभोवताली जर जास्त प्रमाणात गर्दीचे ठिकाणी असतील किंवा गजबजलेले मार्केट असेल किंवा मोठी शाळा किंवा कॉलेज असेल तर याचा त्रास तुम्हाला नक्की होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणी शांत वातावरण राहील याची कुठलीही शाश्वती राहत नाही. हे देखील पाहून तुम्हाला जसं योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही फ्लॅटची निवड करावी.
3- भाड्याचा विचार करून फ्लॅट घ्यायचा असेल तर..- समजा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे परंतु तो रेंटलने देण्यासाठी घ्यायचा असेल तर तुम्ही ग्राउंड फ्लोअरवर फ्लॅट घेणे फायद्याचे ठरेल. कारण ग्राउंड फ्लोअर वर भाड्याने फ्लॅट घेण्याला जास्त मागणी दिसून येते. जर तुम्ही खालच्या मजल्यावर फ्लॅट घेतला तर भाडेकरू कडून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते व तुम्हाला भाड्याच्या माध्यमातून चांगला पैसा मिळू शकतो.
4- विजेचा वापर हा देखील ठरतो महत्त्वाचा मुद्दा– जर तुम्ही टॉप फ्लोअरवर फ्लॅट घेतला तर त्या ठिकाणी विजेचा वापर नक्कीच जास्त प्रमाणात होतो व तुम्हाला वीज बिल देखील जास्त भरावे लागते. उदाहरणच घ्यायचे झाले तर फ्लॅट जितके लोकेशन वर असेल तितके तुम्हाला पाणी पोहोचवण्याकरिता मोटर पंपाला देखील जास्त ऊर्जा लागते.
तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टॉप फ्लोअरच्या फ्लॅटसाठी तुम्हाला नेहमीच फॅन किंवा एअर कंडिशनर चालवणे गरजेचे असते व त्या माध्यमातून देखील विजेचा वापर वाढतो व विज बिल जास्त येते. पुढे विजेचा वापराच्या दृष्टिकोनातून देखील फ्लॅट घेताना विचार करणे गरजेचे आहे.
5- एकत्र कुटुंबासाठी फ्लॅट घ्यायचा असेल तर– तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे परंतु तुमचे कुटुंब हे एकत्र आहे म्हणजे तुमचे एकत्र कुटुंब असेल तर तुम्ही टॉप फ्लोअरचा फ्लॅट घेणे टाळणे गरजेचे आहे. कारण एकत्र कुटुंबासाठी तुम्ही ग्राउंड फ्लोअरलाच फ्लॅट घेणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात व अशा व्यक्तींना गुडघेदुखी किंवा इतर त्रास असतो. त्यामुळे टॉप फ्लोअरपेक्षा ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट घेणे एकत्र कुटुंबासाठी खूप योग्य ठरते.
या परिस्थितीत तुम्ही घेऊ शकता टॉप फ्लोरला फ्लॅट
समजा तुम्ही ज्या बिल्डिंग किंवा अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घेणार आहात त्या अपार्टमेंटच्या सभोवताली किंवा समोरचे लोकेशन जर अतिशय निसर्गरम्य किंवा प्रेक्षणीय असेल किंवा त्या अपार्टमेंटच्या समोर एखादा तलाव किंवा डोंगर असेल तर तुम्ही टॉप फ्लोअरची निवड करू शकता.