तरुणाई म्हटले म्हणजे अंगातील सळसळता उत्साह आणि काहीतरी वेगळे करण्याची आणि त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी कायमच तरुणांमध्ये दिसून येते. अगदी याच मुद्द्याला पकडून जर आपण विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये सध्या अनेक तरुण वळत असून पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या पिकांची तसेच फळबागांच्या लागवडीतून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
यामध्ये अनेक तरुण हे उच्चशिक्षित असून देखील नोकरी न करता ते शेतीमध्ये नशीब आजमावत आहेत. असाच एक जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील तरुणाने एमबीए मार्केटिंग मधून शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर 50 हजार रुपये पगाराची नोकरी मिळवली. परंतु त्याने नोकरीला रामराम ठोकत शेती करण्याचे निश्चित करून पेरू लागवड केली. याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
प्रफुल्लची पेरू लागवडीतील वाटचाल
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील हसनाबाद या गावातील प्रफुल्ल राठी हा तरुण एमबीए मार्केटिंग झालेला असून त्याला प्रति महिना 50 हजार रुपये पगाराची नोकरी देखील होती. परंतु शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यामुळे शेतीमध्येच काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्याच्या मनात होती. त्यामुळे प्रफुल्लने नोकरीला रामराम ठोकला आणि शेतीमध्ये उतरला. परंतु याआधी युट्युबच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शेतीविषयक प्रयोग पाहिले. अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा देखील बघितल्या.
त्यानंतर दुष्काळी भागामध्ये कमीत कमी खर्चात कुठले पीक उत्तम पद्धतीने येऊ शकते याचा अभ्यास केला व त्यानंतर छत्तीसगडमधील रायपूर येथील पेरूची माहिती त्याला कळाली. या पेरूबद्दल वडिलांशी चर्चा करून पेरू लागवड करण्याचे निश्चित केले. वडिलांनी देखील मुलावर विश्वास टाकला व पेरूची शेती करण्याचे निश्चित केले. Youtube च्या माध्यमातून पेरू विषयी संपूर्ण माहिती घेतली व रायपूर या ठिकाणहुन 1000 पेरूची रोपे विकत घेतली. त्यानंतर आठ बाय बारा अंतरावर शेतामध्ये लागवड केली.
या अंतरावर लागवड केल्यामुळे त्यांना इतर पिके देखील आंतरपीक म्हणून घेता आले. लागवड केल्यानंतर पहिल्याच वर्षी चांगले उत्पन्न पेरूपासून मिळाले. परंतु त्यानंतरचे दोन ते तीन वर्ष त्यांचा बाग तोट्यामध्ये गेला. परंतु या पेरूमध्ये आंतरपीक म्हणून आले आणि फुलपिकांचा अंतर्भाव केल्यामुळे पेरू बागेत झालेला तोटा भरून निघाला. दोन वर्षे पेरूने फटका दिला तरीदेखील न हरता त्यांनी नव्या उत्साहाने यावर्षी देखील व्यवस्थित बागेचे नियोजन केले व कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा व औषधांचा वापर न करता गांडूळ खत व शेणखताचा पुरेपूर वापर केला.
तसेच गाईचे शेण व गोमूत्र पासून तयार केलेली स्लरी झाडांना दिली. त्यामुळे पेरूच्या उत्पादनामध्ये खूप मोठा फरक पडला व पेरूची कॉलिटी देखील सुधारली. यावर्षी पेरू चांगल्या प्रमाणात लगडला असून 20 ते 25 टन उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. तसेच पेरू हे कुठल्याही प्रकारच्या कीड व रोगाला बळी पडू नयेत म्हणून त्यांनी फळे लहान असतानाच त्यांना व्यवस्थित आवरण बसवले असून कुठल्याही प्रकारचा रोग किडीचा प्रादुर्भाव त्यामुळे झाला नाही.
त्यांचा पेरू आता तोडणी करिता तयार झाल्यावर व्यापारी खरेदीसाठी आता त्यांच्या शेतात येऊ लागले आहेत. यामध्ये सुरत येथील एका व्यापाऱ्याने 23 क्विंटलची पहिली खेप सुरतला पाठवली असून दर्जानुसार 48 रुपये प्रति किलोचा या व्यापाऱ्याने दर दिला आहे. यावर्षी पेरूला चांगला बहार आल्यामुळे 25 ते 30 टन उत्पन्न मिळण्याचे प्रफुल्लला अपेक्षा असून दहा लाख रुपयांचे उत्पन्न यावर्षी मिळेल अशी प्रफुल्लला खात्री आहे.
अशा पद्धतीने मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने प्रफुल यांनी पेरू बाग यशस्वी केला आहे.