२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले आहे. देशाला कमकुवत करणे व आपली एकता तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. गेल्या दशकात २५ कोटी भारतीयांना गरिबीच्या बाहेर काढण्यात आले. हे एक मोठे यश आहे. प्रत्येक गावात आधुनिक संरचना तयार होत आहेत. सोबतच भारतीय लष्कराची ताकद अभूतपूर्व वाढल्याचे मोदींनी अधोरेखित केले.
‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी ढुंगा’, अशी घोषणा करीत प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्यप्राप्तीची ओढ निर्माण करणारे महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त ओडिशातील कटक येथे आयोजित पराक्रम दिवस कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, नेताजींचे संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे.
त्यांनी विलासी जीवन न जगता देश सोडून स्वातंत्र्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. ते कधीच ‘कम्फर्ट झोन’ अर्थात सुरक्षित आयुष्याच्या बंधनात अडकले नाहीत. म्हणूनच आज घडीला सर्वांनाच विकसित भारत घडवण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’ मधून बाहेर पडण्याची गरज आहे.आपल्याला स्वतःला जगात सर्वश्रेष्ठ बनावे लागणार आहे, उत्कृष्ट गोष्टी निवडाव्या लागणार आहेत,दक्षतेवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे,असे मोदींनी सांगितले.
नेताजींनी स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौजेची स्थापना केली.देशाच्या कानाकोपऱ्यातील माणूस यात सहभागी झाला.प्रत्येकाची भाषा वेगळी होती.मात्र त्यांची भावना फक्त स्वातंत्र्य मिळवण्याची होती.म्हणूनच एकजूटता आज विकसित भारतासाठी एक मोठी शिकवण आहे.तेव्हा स्वराज्यासाठी एकत्र येणे आवश्यक होते.आज विकसित भारतासाठी आपल्याला एकजूट व्हायचे आहे.त्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे, असा मोलाचा संदेश नरेंद्र मोदी यांनी दिला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव द्वीप समूहांना देणे व इंडिया गेटवर त्यांची प्रतिमा स्थापन करणे तसेच त्यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यासह केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांची माहिती मोदींनी दिली.नेताजींना भारताच्या वारशावर मोठा अभिमान होता.देशाचा विकास हा सशस्त्र दलांची बळकटी व संपूर्ण विकासासोबत चालत असतो.
गेल्या दशकात २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले. विकास गंगा गावोगावी पोहोचली आहे. जागतिक स्तरावर भारताची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,असा दावा मोदींनी केला.