अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :-  सध्या राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे.जालना जिल्ह्यातही तापमान सर्व रेकॉर्ड मोडीत आहे.

जिल्ह्यात तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. यामुळे माणसासमवेतच पिकांना देखील मोठा फटका बसत आहे.

वाढत्या उन्हामुळे (Temperature) विहिरीचे पाणी लक्षणीय कमी होत चालले आहे. जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात फळबाग पिकाची (Orchard) लागवड करत असतात, जिल्ह्यातील (Jalna) फळबागायतदार सध्या पाण्याची बचत व्हावी आणि पाणी संपूर्ण उन्हाळाभर टाकावे तसेच फळबागाची जोपासना व्यवस्थितपणे व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.

उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज अधिक भासू लागली आहे. यामुळे शेतकरी बांधव पाण्याचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे.

गोंदेगाव येथील शेतकऱ्यांनी देखील उन्हाळ्यात फळबाग पिकांना पाणी पुरावे म्हणून एक नामी शक्कल लढवली आहे. सध्या शेतकरी बांधवांकडे पाण्याचा साठा थोडाच उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांच्या मते, उन्हात वाढ झाली असल्याने विहिरीची पाण्याची पातळी लक्षणीय कमी झाली आहे यामुळे फळबाग पिकासाठी ठिबक सिंचन प्रणाली द्वारे केवळ एक तास पाणी पुरेल एवढा पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे.

यामुळे पाण्याचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. शेतकरी बांधव आता यासाठी नवनवीन शक्कल देखील लढवीत आहेत.

शेतकरी बांधवांनी आता फळबाग पिकाला पाणी कमी पडू नये तसेच फळझाडाजवळ कायम ओलावा असावा म्हणून सोयाबीन गहू मका इत्यादी पिकांचा भुसा आता झाडांच्या खोडाजवळ टाकत आहेत.

भुशाची मल्चिंग केल्यामुळे झाडांना दिलेल्या पाण्याचे होत असलेले बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि साहजिकच यामुळे झाडांजवळ दीर्घकाळ ओलावा राहतो.

यामुळे शेतकरी बांधवांना फळबागांसाठी वारंवार पाणी द्यावे लागत नाही. शेतकऱ्यांच्या या नामी शक्कल मुळे निश्चितच उन्हाळ्यात फळबाग पिकांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही, संपूर्ण हंगाम भर यामुळे फळबागांना पाणी देणे शक्य होणार आहे.

वाढत्या तापमानामुळे पिकांना अधिक पाण्याची गरज भासत असल्याने शेतकरी बांधवांनी लढवलेली ही नामी शक्कल मोठी फायदेशीर सिद्ध होत असून आता फळबागांना नव्याने पालवी फुटत आहे. यामुळे संपूर्ण शेत शिवार हिरवेगार झाल्याचे बघायला मिळत आहे.