अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra News : पिकांना किडींपासून तसेच रोगापासून वाचवण्यासाठी शेतकरी बांधवांना (Farmers) नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके औषधे फवारणी करावी लागते.

यामुळे पिकांचे संरक्षण होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. असे असले तरी शेतकरी बांधवांनी औषध फवारणी करताना काळजी बाळगणे अपरिहार्य आहे.

नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवड व सिन्नर येथे निष्काळजीपणे औषध फवारणी दोन शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे.

यामुळे औषध फवारणी करताना काळजी घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून (Agri Expert) देण्यात येत आहे. शेती पिकांना कीटकनाशक फवारणी करताना चांदवड व सिन्नर तालुक्यात दोन शेतकरी मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे.

या शेतकऱ्यांनी सावधानता बाळगली नसल्याने ही घटना घडली आहे. औषध अधिक विषारी होते आणि हे औषध सदर शेतकऱ्यांच्या नाका-तोंडात गेल्याने ही घटना घडली.

दरम्यान या संबंधित शेतकऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले होते मात्र उपचारादरम्यान या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघड झाले.

त्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीत मोठी हळहळ व्यक्त केली जात असून याबाबत कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी बांधवांनी औषध फवारणी करताना निष्काळजीपणा करू नये. यामुळे शेतकरी बांधवांचे अहित होऊ शकते.

औषध फवारणी करताना ही काळजी घ्या

»पिकांवर कीटकनाशक बुरशीनाशक तन नाशक इत्यादी औषधांची फवारणी करताना आवश्यक द्रावण तयार करताना लहान मुलांना यापासून दूर ठेवा.

»हानिकारक औषधांपासून संरक्षण करण्यासाठी डोळ्याला गॉगल, चेहऱ्याला मास्क, हाताला ग्लोवस, संपूर्ण अंग झाकले जाईल अशी कापडं, पायात बूट परिधान करा. जेणेकरून औषध फवारतांना उडणारी जिंझ शरीरावर येणार नाही.

»फवारणी करताना नेहमीच वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

»अधिक उन्हात तसेच वादळ किंवा वेगाने वारे वाहत असतील तर औषध फवारणी करणे टाळावे.

»एवढेच नाही औषध फवारणी करताना, गुटखा, तंबाखू, इत्यादी अमली पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

»फवारणी केल्यानंतर उरलेले कीटकनाशक अथवा अन्य विषारी औषधे व्यवस्थित पणे साठवून ठेवावी किंवा त्याची विल्हेवाट व्यवस्थित पणे लावावी.

»नदीत,कालव्यात, गुरांसाठी तयार केलेल्या पाणवठ्यात कधीच औषध फवारणी यंत्रे धुवू नये. यामुळे मानवाचे तसेच मुक्या प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.