Maharashtra news : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना प्रेमापोटी सांगली आणि कोल्हापूरमधील लोकांनी वर्गणी काढून अलिशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे.

शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांचा हा लाडका नेता अलिशान फॉर्च्युनरमधून फिरणार आहे.त्यांनी म्हटले आहे, धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही.

इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे त्याचा मी कृतज्ञपुर्वक स्वीकार करतो.

या कारची किंमत साधारण ४० लाख रुपयांच्या घरात आहे. शेट्टी हे गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते म्हणून लोकप्रिय आहेत. जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या राजू शेट्टी यांनी खासदारकीची निवडणूक जिंकण्यापर्यंत मजल मारली होती.

यापूर्वीही राजू शेट्टी निवडणुकीसाठी उभे राहिले होते तेव्हा जनतेने लोकवर्गणी काढून त्यांच्या निवडणूक अर्जासाठी लागणार अनामत रक्कम (डिपॉझिट) भरली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जनतेने राजू शेट्टी यांना खास गिफ्ट दिले आहे.