file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  दुर्मिळ वस्तू देण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपये घेऊन त्या बदल्यात 10 लाख रूपये देण्याचे आमिष दाखवून येथील व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी अण्णा रावसाहेब म्हस्के (डॉक्टर कॉलनी रा. बुरूडगाव रोड) व त्याच्या साथीदारांविरूद्ध (नाव माहिती नाही) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सचिन मोतिलाल कटारिया (रा. तपोवन रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 3 ऑगस्ट रोजी म्हस्के हा एमआयडीसीतील माझ्या अरिहंत इंडस्ट्रिज कंपनीत आला आणि तो म्हणाला की, आमच्या मित्रांकडे दुर्मिळ वस्तू आहेत.

त्याची बाजारभावात करोडो रुपये किंमत आहे. तुम्ही जर मला पाच लाख रुपये दिले तर त्याचे मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो, असे तो म्हणाला.

त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या घरी जाऊन पाच लाख रुपये दिले.त्यानंतर 10 दिवसांनी मी त्यास फोन केला, तेव्हा त्याने तुमचे काम होईल, असे सांगून वेळ मारून नेली.

वारंवार पैशाची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.