अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- फेसबुकवर झालेली मैत्री ज्येष्ठ महिलेला चांगलीच महागात पडली असून, या महिलेकडून साडेचार लाख रूपये सायबर चोरट्यांनी उकळले आहेत. परदेशातून पाठविलेले गिफ्ट कस्टमने पकडल्याचे सांगत हे पैसे उकळले आहेत.

याप्रकरणी ६२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काही महिन्यांपुर्वी भोसलेनगरमध्ये घडली आहे.

तक्रारदार या भोसलेनगर परिसरात राहतात. त्यांची फेसबुकवर डॉ. डोमीनीक गोबेल याची फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने स्वीकारली होती. त्यानंतर त्याने जेष्ठ महिलेशी चाटिंगद्वारे बोलत त्यांचा विश्वास संपादित केला.

तसेच, व्हॉटसअ‍ॅपद्वारे बोलणे सुरू केले. तक्रारदार यांना २४ एप्रिलला स्वतःचा वाढदिवस असल्याचे सांगितले. परदेशातून गिफ्ट पाठविले आहे, असे सांगितले. त्यानंतर एका अनोळखी महिलेचा तक्रारदार यांना फोन आला.

तिने दिल्ली विमानतळाच्या कस्टम कार्यालयातून बोलत असून, तुमचे पार्सल अडकल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना ते सोडवून घेण्यासाठी विविध कारणे सांगत ४ लाख ४३ हजार रूपये आरटीजीएसद्वारे भरण्यास भाग पाडले.