अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-   प्रत्येकाला गाणे सादर करावेसे वाटते , त्यासाठी अनेकजण मेहनत घेतात,रियाज करतात मात्र हे सर्व करताना आपण कसे गातो हे स्वत: समजून घेणेच विसरतात.

उत्कृष्ठ गायक होण्यासाठी त्या त्या गाण्यातील भाव ,सादरीकरण महत्वाचे असते हे जाणून घ्या , स्वत:ला ओळखा,इतरांच्या आवाजाची नक्कल न करता गाणे सादर करा असे मत संगीतकार व गायक डॉ.सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अहमदनगर मध्ये प्रथमच स्वरांकित फाऊंडेशनने आयोजित केलेल्या दोन दिवसीय भावसंगीत कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक कडूभाऊ काळे,

आदेशजी चंगेडिया, सुरजजी आग्रवाल, स्वरांकितचे ऋषिकेश कुलट व मान्यवर उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत भावसंगीतातले वेगवेगळे विषय डॉ. कुलकर्णी यांनी सहभागी ना समजून सांगितले. आवाजाची काळजी कशी घ्यायची, माईकचे तंत्र, निवड ,किती अंतर असावे.

आवाजाची फेक, शब्द समजून गाणे , शब्दोचार, स्वर लावण्याची योग्य पद्धत, शास्त्रीय व सुगम संगीतामध्ये आवाज लावण्याची पद्धत, किती वेळ रियाज करावा, रियाज कसा करावा, चाल कशी सुचते, अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

गायकाने प्रत्येक वेळी परिस्थितीचे भान ठेवून रसिक प्रेक्षकाना काय भावेल याचा विचार करून गाणे सादर करावे, जे गीत सादर करायचे ते पाठ असलेच पाहिजे,सादर केलेले गाणे रसिक प्रेक्षकाना आनंद देणारे व भाव निर्माण करणारे असावे असे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.

तालवादक ऋषिकेश कुलट यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यशाळेस नगर रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अशा कार्यक्रमातून जास्तीत जास्त रसिक अहमदनगर मध्ये तयार होतील असा विश्वास ऋषिकेशने यावेळी व्यक्त केला.

तसेच एक लाख लोकांना तालवाद्य शिकवण्याचं ध्येय बाळगलेलं असून त्यासाठी अहोरात्र झटत असून नगरकरांसाठी नवीनतम कार्यक्रम घेऊन येऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रसिद्ध उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया व अहमदनगर एज्युकेशन सोसायट च्या सी.ई. ओ. छायाताई फिरोदिया यांनी कार्यशाळेला शुभेच्छा देऊन उपक्रमाचं कौतुक केलं.