Maharashtra : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत कोणत्या ना कोणत्या विधानावर वादात सापडत असतात. आता राज्यपालांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यभरातून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. आता मनसे पक्षी आक्रमक होताना दिसत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी आता मनसेकडून जोर धरताना दिसत आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा अशी मागणी मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती बेताल वक्तव्य करते.

जे आपले आदर्श आहेत त्यांच्यावर बोललं जात आहे. तरीही राज्यपालांवर कारवाई का होत नाही? यांना यांच्या पक्षातले वरिष्ठ का समजावून सांगत नाहीत?, असा प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहेत आणि तुम्ही त्यांना एकेरी कसं बोलू शकता? मग आम्हाला देखील तुम्हाला एकेरी बोलता येतं. हे राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात म्हणून मी बोललो यांचं नाव बदलून कळीचा नारद ठेवा.

हे कधी जातीवर बोलून भांडणे लावायचं काम करतात. तर कधी महापुरुषांवर अवमानकारक बोलतात. राज्यपालांचं वय झालं आहे त्यांना रिटायर करा, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ट्विट केले आहे. “साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो.

एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यानी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे” असे ट्विट त्यांनी केले आहे.