Maharashtra news : ग्रामपंचायतीत पूर्वी ग्रामसेवक हे एकच पद होते. कालांतराने ग्रामविकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले. आता गावाचा कारभार हे दोघे अधिकारी हाकतात.

मात्र, अशी दोन पदांना आता ग्रामसेवक संघटनेकडूनच विरोध सुरू झाला आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून ‘पंचायत विकास अधिकारी’ हे एकच पद निर्माण करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.या मागणीवर अभ्यास करून अहवाल सादर कण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

नाशिकचे विभागीय उपायुक्त (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.ही समिती संबंधित पद निर्माण करण्याची आवश्यकता, आणि त्याची कारणमिमांसा जाणून घेईल.

त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण करण्यासाठी वेतनश्रेणीचा अभ्यास करेल. वेतन, वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना या बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.