अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्डाच्या फेब्रुवारी व मार्च मध्ये होणार्‍या परीक्षेचे स्वरूप व मूल्यमापन कसे असेल? याबाबत स्पष्ट व मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, उपाध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविले आहे.

इयत्ता दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे स्वरूप व मूल्यमापनाबद्दल मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आले नसल्याने, शिक्षक, पालक व विद्यार्थी संभ्रमात असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही शाळा जून 2021 पासून सुरळीत सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे इयत्ता दहावी बारावीचे वर्गही पूर्णवेळ सुरू होऊ शकले नव्हते.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 4 ऑक्टोंबरपासून राज्यभरातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाचे प्रत्यक्ष अध्यापन सुरू झाले आहे. तरी सर्वच विद्यार्थी अजूनही शाळेत शंभर टक्के उपस्थिती राहत नाही.

ऑनलाईन अध्यापनही सुरू आहेत. दरवर्षी साधारण डिसेंबर अखेरपर्यंत दहावी, बारावीचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला असतो. पुढील दोन महिन्यात पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेची तयारी चालू असते.

या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेचे स्वरूप नेमके कसे असेल? याबाबत विद्यार्थी पालक आणि शिक्षक संभ्रमात आहेत. त्यांच्याकडून मूल्यमापन परीक्षा याबाबत काही बदल होईल का?

अशी विचारणा होत आहे. त्यातच अन्य बोर्डाने त्यांच्या परीक्षेचे स्वरूप बदलून जाहीर केले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचे स्वरूप व मूल्यमापन कसे असेल?

परंपरागत पद्धतीत बदल होईल का? मूल्यमापनात सुट असेल का? ही प्रश्‍न अनुत्तरीत असल्याने इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचे स्वरूप मूल्यमापन याबाबत स्पष्ट व मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.