अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- बळीराजावर पुन्हा एकदा आस्मानी संकट घोंगावू लागले आहे. यामुळे पुन्हा एकदा बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला होता.(Hail fell)

दरम्यान आज नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच तालुक्यातील काही ठिकाणी गारा देखील कोसळल्या आहेत.

नेवासा तालुक्यातील गंगाथडी परिसरातील जैनपूर ,घोगरगाव तसेच बेलपिंपळगावच्या काही भागात मंगळवारी दुपारी अचानकपणे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आज दुपारच्या सुमारास अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला होता आणि पावसाला सुरुवात झाली. त्या पावसात गारांचा पण पाऊस सुरू झाला होता.

दरम्यान अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच जनावरांचे देखील हाल झाले. सध्या शेतात ऊस,

कांदे लागवड तसेच ऊस तोडणी सुरू असल्याने या वादळी गारांच्या पावसात मजुरांची देखील मोठी धावपळ उडाली. या पावसामुळे ऊस, कांदा, कांदा रोप, मका, घास, फळबागा तसेच भाजीपाला यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.