file photo

मुंबई : राज्यात मनसे (MNS) मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी चांगलीच आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेला भाजपचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे मात्र भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मनसेवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

आशिष शेलार म्हणाले, हनुमान चालीसा हा भाजपचा कार्यक्रम नाही. पण हनुमान चालीसाच्या पठणाला कोणी रोखत असेल, तर त्याला भाजपचा विरोध असेल. भाजप हा हिंदूत्वाच्या विचारांचा पक्ष आहे.

हिंदूत्व (Hindutva) हे राष्ट्रीयत्व ही आमची भूमिका आहे. कोणत्याही जाती धर्मावर सक्ती केली जात नाही. तसेच विशिष्ट धर्माचे लांगूलचालन भाजपला अभिप्रेत नाही.

राम मंदिर, रामसेतू, ३७० कलम रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा आदी प्रमुख मुद्दय़ांवर भाजपने नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे.

भूमिका मांडण्यासाठी आम्हाला कोणालाही पुढे करण्याची आवश्यकता नाही, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. सर्वधर्मभावाच्या नावाखाली हिंदूंवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. भाजप मनसेला पुढे करून आपला कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप शेलार यांनी फेटाळून लावला आहे.

मनसेच्या सर्व सभांना सर्वत्र परवानगी दिली जाते. मनसेबाबात वेगळी चर्चा कानावर येते. बहुधा राष्ट्रवादीचेच नेतृत्व मनसेचा वापर करून घेत असावे. मनसेला पुढे करून राष्ट्रवादी शिवसेनेची अडचण करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य शेलार यांनी केले आहे.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, शिवसेनाच काय, काँग्रेस, राष्ट्रवादी या कुणाबरोबरही भाजपचे शत्रूत्व नाही. हे सारे आमचे राजकीय विरोधक आहेत. शिवसेनेच्या विश्वासघातकी कार्यपद्धतीमुळेच आमच्यात वितुष्ट निर्माण झाले.

युतीचा फायदा दोघांनाही झाली. युतीतूनच शिवसेनेचा विस्तार होत गेला. शिवसेनेचा विस्तार भाजपमुळेच अधिक झाला, असा दावाही शेलार यांनी केला. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना आम्ही कडाडून विरोध केला.

या सरकारची अनेक प्रकरणे भाजपने समोर आणली. अशा वेळी आम्ही करीत असलेल्या आरोपांना समाधानकारक उत्तरे देता येत नसल्यानेच गोंधळ निर्माण करून त्याचे सारे खापर भाजपवर फोडले जात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.

भाजपकडून करण्यात आलेले आरोप किंवा उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ांवर समाधानकारक उत्तरे द्यावीत. पण भाजप समाजातील वातावरण बिघडवीत असल्याचा कांगावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेना आमच्याबरोबर असताना मित्राने ५ वर्षे त्रास दिला.

आता हीच शिवसेना उलटा कांगावा करीत असल्याची टीकाही शेलार यांनी केली. मुख्यमंत्रीपदावरूनच शिवसेनेने दगाबाजी केली. भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, असा खोटा प्रचार काही जणांनी केला असेही शेलार म्हणाले.

महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले तरी आगामी निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असेल. राज्यात तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल. मोदी यांना मानणारा वर्ग आणि विरोधी वर्ग अशी लढाईत राज्यातील जनता ही मोदींनाच समर्थन देईल असाही विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे.