Ahmednagar News : भाचाला मारहाण का केली, असे विचारायला गेलेल्या मामाला पाच जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना केडगावमध्ये घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी अंबादास पवार, अनू क्षीरसागर, कुणाल बादल, गोट्या भांबरे, कृष्णा बागडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बबन सुळ (वय 40 रा. शास्त्रीनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी सायंकाळी आठच्या दरम्यान पाच जणांनी मारहाण केल्याची माहिती फिर्यादीचा भाचा यश गोफणे याने सुळ यांना दिली. सुळ त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि तेथून भाचाला सोबत घेऊन मारहाण करणार्‍यांकडे विचारणा करायला गेले.

तेथे गेल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शिवीगाळ करू नका, असे सुळ म्हणाले असता आरोपी सनी पवार याने लाकडी दांडक्याने सुळ यांच्या हातावर मारहाण केली.

तसेच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत परत आमच्या गल्लीत दिसल्यास जिवंत सोडणार नाही, असा दम दिला. त्यानंतर आरोपी पसार झाले. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.