अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- नवरात्रोत्सवात अनेक भाविक पायी चालत देवीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणी जातात. असेच पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथिल रहिवाशी व गावच्या सरपंच शोभा पालवे यांचे पती शिवाजीराव पालवे मोहटादेवीच्या दर्शनासाठी पायी जात होते.

त्यांनी गावातील सहकाऱ्यांसोबत श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाचे दर्शन घेवून दुपारनंतर मढी येथून पुढे मोहटादेवीच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत असताना पाथर्डीजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

त्या ठिकाणीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पालवे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कोल्हारसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.