अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- आधुनिक जीवनशैलीने माणसाला दिलेल्या अनेक घातक आजारांचे प्रवेशद्वार असलेला त्रास म्हणजे उच्च रक्तदाब.

माणसाचे राहणीमान, दिनचर्या, कामकाज आणि आचार-विचारांकडे पाहिल्यास असे दिसून येते की, भौतिकवादी ऐश्वर्यपूर्ण राहणीमान आणि आचार-विचारच असे झाले आहेत की, ज्यामुळे साध्या क्षुलुक गोष्टींमुळेही माणूस टेशन आणि रागाच्या आधीन होत असतो.

आज मोबाइल, कॉम्प्युटर या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढल्यामुळे जीवनशैली बरीचशी आळसाकडे झुकली आहे. जर आपण उच्च रक्तदाब टाळू इच्छित असाल तर खालील गोष्टींकडे लक्ष द्या.

» ज्या पदार्थांच्या सेवनाने रक्‍तात कोलेस्ट्रॉल आणि शरीरात अवाजवी चरबी वाढते त्याला चुकीचा आहार म्हणतात. अशा आहारात अंडी, मटण, मद्य, तिखट तेलकट तुपट पदार्थ सामील आहेत. हे पदार्थ टाळून आपण उच्च रक्तदाबाचा धोका टाळू शकता.

» गैर विहारात आळसात राहणे, दिवसभर बैठे काम करणे, व्यायाम न करणे, शारीरिक श्रम टाळणे, जास्त प्रमाणात वेळीअवेळी खाणे इ. गोष्टी येतात. यासाठी परिश्रमी व्हा आणि वेळच्या वेळी रोजची कामे करा. तसेच व्यायाम, चालणे यावर भर द्या.

» आजच्या आधुनिक जीवनशैलीत वस्तूंचा वापर वाढला असल्यामुळे माणूस जास्तच ऐषारामी व आळशी झाला आहे. दिवसभर बसून राहिल्यामुळे अन्नाचे पचन हू व्यवस्थित होत नाही. हे टाळण्यासाठी दिवसातील काही वेळ व्यायाम, चालणे यासाठी द्यायला हवा.

» कामुक, क्रोधी, मत्सरी आणि चिंता करण्याची प्रवृत्ती सोडा. ऐषारामी जीवन जगण्याचा मोह टाळा.

» योग्य आणि ठराविक वेळीच साधे सुपाच्य जेवण करा. पचनक्रिया योग्य राखा. शरीरावर स्थूलत्व चढू देऊ नका. शरीर स्थूल करणारे आणि रक्तात कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ कमी खा.

» चिंता न करता चिंतन करा. चिंता व चिंतनात खूप फरक असतो. मनाच्या इच्छेविरुद्ध आणि त्रासदायक विचार करण्याला चिंता म्हणतात तर कोणत्याही समस्येवर विवेकाने आणि शांतपणे विचार करण्याला चिंतन म्हणतात. चिंता शरीर व बुद्धीचा नाश करते तर चिंतन मेंदू व बुद्धीचा विकास करते.

» रक्तदाब असणे एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. हा कोणताही रोग नाही. पण जेव्हा काही कारणांमुळे रक्तदाब जास्त होतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. रक्तदाब वाढू न देण्यासाठी तो वाढवणाऱ्या सर्व कारणांचा त्याग करून साधे सरळ व निश्‍चित जीवन जगण्याचा भरपूर प्रयत्न करा.