पुणे शहरवासीयांना गेल्या महिनाभरात डेंग्यूने हैराण केले आहे. त्यातच आता ‘झिका’ विषाणूने देखील डोके वर काढले आहे. शहरात झिका चांगलाच फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मंगळवारी आणखी दोन जणांना झिकाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून समोर आले. त्यामुळे पुण्यातील झिका रुग्णांची संख्या आता एकूण सातवर पोहोचली आहे. त्यामध्ये दोन गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात अली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, झिका विषाणू हा ‘एडिस’ नावाचा डास चावल्याने पसरतो. एडिस डास चावल्याने डेंग्यू, चिकनगुनिया आणि येलो फीवर या आजारांना सामोरे जावे लागते. या तिन्ही आजारांमध्ये साम्य आहे. या तिन्ही आजारांचे विषाणू पश्चिम, मध्य आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया या भागात आढळून येतात.
गरोदर महिलांना झिका विषाणूची लागण झाल्यास त्यांच्या गर्भातील बाळावरही त्याचे परिणाम होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एरंडवणा भागात सुरुवातीला झिकाचे दोन रुग्ण सापडले. त्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला.
आसपासच्या परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. या दोन्ही रुग्णांबाबत धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही रुग्ण बाहेरगावी जाऊन आल्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे परिसरात सर्वेक्षण, तपासणीला गती देण्यात आली.
तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या संशयित व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन महापालिकेकडून सर्व खासगी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी विभागाला करण्यात आले. त्यावेळी हडपसर येथील एका रुग्णाचा अहवाल झिका पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मात्र त्याला एक महिना उलटून गेला होता.
दरम्यान, पावसामुळे डासांची पैदास झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
झिकाची लक्षणे ?
झिका विषाणूची लक्षणे सामान्य आहेत. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीची लक्षणे प्रामुख्याने जाणवतात. तसेच शरीराचे स्नायू जड होतात. स्नायू दुखतात. हिरड्याही दुखू लागतात. त्याचबरोबर शरीरावर लाल रंगाचा पुरळ उठण्यास देखील सुरुवात होते.
महापालिकेचे प्रयत्न अपुरे ?
झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने ताप रुग्ण सर्वेक्षण, गर्भवती महिला सर्वेक्षण, डासांचे सर्वेक्षण व इतर उपाययोजना केल्याचे सांगितले. मात्र तरीही झिकाचा संसर्ग काही आटोक्यात येताना दिसत नाही. त्यातच गर्भवती महिलांना संसर्ग होणे हे त्यांच्या बाळांसाठी अधिक धोक्याचे समजले जाते.
गर्भवती महिलांच्या बाळांना धोका अधिक !
झिका जीवघेणा आजार नाही. ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येतात आणि उपचारांनी ती जातात. परंतु त्याचा खरा धोका गर्भवती महिलांच्या बाळांना आहे. गर्भवती महिलेला या रोगाची लागण झाल्यास तिच्या बाळामध्ये मायक्रोसेफेली म्हणजेच त्याच्या डोक्याचा घेर हा नेहमीच्या तुलनेत छोटा होऊ शकतो. तसेच इतर विकृतीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.