१ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : प्रयोगशाळेत तयार करण्यात येत असलेल्या एका जिवाणूमुळे महाविनाशाला आमंत्रण मिळू शकते. ‘मिरर लाइफ’ (प्रतिबिंबात्मक जीव) म्हणवले जाणारे हे जिवाणू (मिरर बॅक्टेरिया) संपूर्ण मानवजात नष्ट करू शकतात, असा इशारा प्रमुख शास्त्रज्ञांनी दिला असून, यासंदर्भातील संशोधन तातडीने थांबवण्याचे आवाहन केले आहे.
निसर्गात आढळणाऱ्या रेणूंच्या प्रतिबिंबात्मक आवृत्त्यांपासून बनवण्यात येत असलेले हे सेंद्रिय जीव पृथ्वीवरील जिवांना दिसू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी ते अदृश्य असतील, त्यामुळे ते सर्वच सजीवांच्या रोगप्रतिकारक प्रणालींना सहजपणे चकमा देऊ शकतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जर हे मिरर बॅक्टेरिया प्रयोगशाळेतून निसटले तर त्यांना वनस्पती, प्राणी व मानवाला घातक संसर्ग घडवून आणण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि असे झाले तर त्यानंतर जे काही घडेल ते अत्यंत विध्वंसक असेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
सेंद्रिय जीवशास्त्रज्ञांनी आधीच मिरर प्रथिने आणि मिरर आनुवंशिक रेणू तयार केले आहेत. तथापि, संपूर्ण मिरर बॅक्टेरियाची (प्रतिबिंबात्मक जिवाणू) अद्याप निर्मिती झालेली नाही. या जिवाणूंच्या निर्मितीला अजून एका दशकाचा अवधी असला तरी ‘सायन्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रकाशित ३०० पानांच्या तांत्रिक अवलोकनात मिरर बँक्टेरिया निर्माण करण्याच्या दिशेने भरीव प्रगती झाली असल्याचे म्हटले आहे.
नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व अन्य तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ३८ जणांच्या एका गटाने यासंदर्भातील सर्व प्रकारचे नवे संशोधन तातडीने थांबवण्याचे आवाहन केले असून, या गटात यापूर्वी मिरर बॅक्टेरियाच्या निर्मितीचा प्रयत्न केलेल्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे.
ज्याप्रमाणे तुमचा डावा हात तुमच्या उजव्या हाताचे प्रतिबिंब आहे, त्याचप्रमाणे अनेक जैविक रेणूंमध्ये डाव्या आणि उजव्या हाताचे प्रतिबिंबात्मक रेणू असतात. जीवशास्त्रासाठी हे वैशिष्ट्य यासाठी महत्त्वाचे आहे कारण की, ते प्रजातीनुसार बदलत नाहीत, पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी बनवणाऱ्या रेणूत हीच डाव्या-उजव्या हाताची रचना असते.
उदा आपल्या डीएनएची द्विसर्पिल रचना उजव्या हाताच्या रेणूंनी (दक्षिणावर्ती संरचना) बनलेली आहे तर प्रथिने डावखुऱ्या अमिनो अॅसिड्सनी बनवलेली (वामवतीं संरचना) असतात. याउपरही शास्त्रज्ञ असे म्हणू शकतील की, आपल्या डीएनएचे उजव्या हाताचे असणे ही वस्तुस्थिती एक उत्क्रांती योगायोग असून, जीवन हे प्रतिबिंबात्मक घटकांपासून विकसित झाले नसण्याचे कोणतेही कारण नाही
ही जोखीम निश्चितच व्यवहार्य नाही’
‘जीवनाचे हे रूप कधीही अस्तित्वात नव्हते, तसेच ते आतापर्यंत कधी विकसितही झालेले नाही. त्यामुळे सर्व जैवरासायनिक आंतरक्रिया भिन्न असतील व त्या कदाचित योग्यरीत्या कार्यही करणार नाहीत.आम्ही सेंद्रिय जीवशास्त्राच्या अवकाशाला मर्यादा घालू इच्छित नाही. मात्र असा जीव तयार करणे जोखीम घेण्यासारखे निश्चितच नाही, असे पीट्सबर्ग विद्यापीठातील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे सहलेखक डॉ. वॉन कूपर यांनी सांगितले.
मिरर बॅक्टेरियाचा नेमका धोका काय आहे,हे स्पष्ट करताना केंब्रिज विद्यापीठाचे नोबेल विजेते जीवशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहलेखक ग्रेगोरी विन्टर यांनी सांगितले की, जिवंत जीव त्यांचे प्रतिबिंबात्मक रूप असलेल्या या जिवाणूंची ‘विदेशी’ म्हणून ओळख पटवू शकणार नाहीत.त्यामुळे त्यांच्या हल्ल्यांपासून त्यांना स्वतःचा बचाव करता येणार नाही.
धोका नेमका कसा ?
उदाहरणार्थ: मानवी शरीर मिरर बॅक्टेरियांविरुद्ध प्रतिपिंडे अर्थात अँटिबॉडीज बनवण्यासाठी संघर्ष करेल. तथापि, ते संसर्ग आटोक्यात आणू शकणार नाही. ही गोष्ट मिरर बॅक्टेरियांचा हल्ला झालेल्या वनस्पतीसह अन्य जीवांनाही लागू असेल.
असा जीव निर्माण करणे शक्य
आपल्या समजुतीप्रमाणे जीवनातून प्रतिबिंबात्मक जीवन उत्क्रांत होऊ शकत नसले तरी शास्त्रज्ञांच्या मते सर्व प्रतिबिंबात्मक जैविक रेणूंनी बनलेला जीव निर्माण करणे अशक्य नाही. पृथ्वीवरील जीवन केवळ एकाच आकाराचे रेणू हाताळण्याच्या दृष्टीने विकसित झालेले असल्याने ही गोष्ट धोकादायक बनते.