Home Remedies On Cold :- आपल्यापैकी बऱ्याच जणांना थोडेजरी वातावरणामध्ये बदल झाला किंवा धूळ, धूर किंवा प्रवास केला तरी देखील सर्दी आणि शिंकांचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. महिला वर्गाच्या बाबतीत पाहिले तर नुसते घरामध्ये झाडू जरी मारला तरी देखील लागोपाठ आणि मोठ्या प्रमाणावर शिंका यायला लागतात.
ही समस्या बऱ्याच जणांना दिसून येते व तसे पाहायला गेले तर सर्दी व शिंका सामान्य आरोग्य समस्या आहे. परंतु यामुळे व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर त्रस्त होते. जरी आपण यांच्यावर औषधोपचार केला तरी साधारणपणे दोन ते तीन दिवस सर्दी किंवा शिंकांचा त्रास जात नाही. यावर अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे घरगुती उपाय देखील बरेच जण करतात. परंतु यामुळे देखील हवा तेवढा अपेक्षित असा फरक जाणवत नाही. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण अतिशय सोपे उपाय बघणार आहोत जे सर्दी आणि शिंकांच्या त्रासापासून आराम मिळवून देतील.
हे उपाय सर्दी आणि शिंकापासून मिळवून देतील आराम
1- रात्री झोपण्याआधी वाफ घ्यावी- वारंवार सर्दी येत असेल किंवा शिंका येत असतील तर रात्री जेव्हा तुम्ही झोपाल त्याआधी वाफ घ्यावी. आपल्याला माहित आहे की जेव्हा सर्दी आलेली असते तेव्हा नाक सुजलेले दिसून येते. यामध्ये गरम पाण्याच्या वाफेमुळे हा त्रास कमी होतो सायनस मुळे जो काही कफ जमा झालेला असतो तो देखील निघण्यास मदत होते. याकरिता गरम पाण्यामध्ये लवंग, लसणाच्या पाकळ्या तसेच मीठ टाकावे. कारण या पदार्थांमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात व त्याचा फायदा होतो.
2- हळद दुधाचा वापर- तुम्हाला जर सर्दी आणि शिंकांचा त्रास सुरू झाला असेल तर याकरिता तुम्ही रोज रात्री कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाकून त्या दुधाचे सेवन करावे. या उपायामुळे सुद्धा शिंकांचा त्रास लवकर कमी होतो. दुधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट सर्दी आणि शिंकापासून बचाव करते व रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. या उपायामुळे व्हायरल इन्फेक्शन पासून होणाऱ्या आजारांपासून देखील वाचता येते.
3- पाण्यात आल्याची पुड- सर्दी आणि शिंकांमध्ये हा उपाय देखील फायद्याचा ठरतो. हा उपाय करताना पाणी उकळून घ्यावे व त्यामध्ये आल्याची पुड टाकावी. त्यात मध मिसळून ते पाणी प्यावे. त्यामुळे सर्दी आणि शिंकांपासून मोठा दिलासा मिळतो. इतकेच नाहीतर आलं आणि गुळाचे सेवन केले तरी देखील सर्दीच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते. हा उपाय करताना आले चांगले कुटून घ्यावे व त्याचा रस काढून घ्यावा व त्यात गुळ मिसळून सेवन करावे. दिवसातून दोन वेळा जरी हा उपाय केला तरी आराम मिळतो.