देशासह जगभरात कॅन्सरचे रुग्ण आढळतात. यावर स्पेसिफिक उपचार नसले तरी इतर काही उपचारांद्वारे रुग्णावर इलाज केले जातात. दरम्यान आता अमेरिकेतील संशोधकांनी एक नवीन संशोधन
समोर आणले आहे. यामध्ये नखांच्या रंगावरून व इतर काही गोष्टींवरून कॅन्सर बाबत कळणार आहे.
तुमच्या नखांच्या रंगामध्ये (सामान्यतः पांढरे आणि लाल) बदल होत असल्यास आणि नखांच्या टोकावर फुगवटा आल्यास सावध राहा. यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) च्या शास्त्रज्ञांनी याबाबत नवे संशोधन केले आहे.
नखांच्या असामान्य स्थितीला ओनिकोपॅपिलोमा म्हटले जाते. यात नखे आकाराने मोठी होतात. नखांच्या रंगांमुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता कळते असे हे तज्ज्ञ म्हणतात.
निदानाचा त्वरित विचार हवा..
एनआयएचच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्थरायटिस अँड मस्कुलोस्केलेटल अँड स्किन डिसिजेस (एनआयएएमएस) मधील त्वचाविज्ञान सल्ला सेवांचे प्रमुख एडवर्ड कोवेन म्हणाले की, बीएपी१ ट्यूमर प्रोडिस्पोझिशन सिंड्रोमच्या निदानाचा त्वरित विचार केला पाहिजे. हा आजार सामान्य लोकांमध्ये क्वचितच आढळून येतो. या संशोधनामुळे या आजारावर तातडीने उपचार करण्यास मदत होईल.
बीएपी १ ट्यूमर प्रोडिस्पोझिशन सिंड्रोम म्हणजे काय?
जेएएमए डर्माटोलॉजी नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ओनिकोपॅपिलोमा हा एक दुर्मिळ आनुवंशिक विकार असू शकतो. याला बीएपी १ ट्यूमर प्रोडिस्पोझिशन सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. बीएपी१ जनुकातील उत्परिवर्तन सिंड्रोमच्या वाढीसाठी मदत करते. यामुळे कर्करोगाच्या गाठी होण्याचा धोका वाढतो असे म्हटले आहे.
कर्करोग ही जागतिक स्तरावर वाढत असलेल्या गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो मृत्यू होतात. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होऊ शकतो, प्रत्येकाने त्याच्या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.